गायरान जमिनीचं वाटप आणि सिल्लोड महोत्सवावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करीत विरोधकांनी सोमवारी दोन्ही सभागृहांचे काम बंद पाडलं. या प्रकरणांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांची चूक असेल तर त्यांना पाठिशी घालणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन आजही सभागृहात विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना यासंबंधी भाष्य केलं.
“आरोप करणारे आरोप करत असतात. पण ज्या मंत्र्यांवर आरोप झाले आहेत, त्यांनी उत्तर देणार असल्याचं जाहीर केलं आहे. ते आज उत्तर देतील. सीमाभागाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यांसंबधी मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली आहे. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागाला न्याय दिला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे काय सवलती देता येतील यावर विचार करुन त्यासंबंधीच्या घोषणा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील,” असं केसरकरांनी सांगितलं आहे.
सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; गायरान जमीन वाटप, सिल्लोड महोत्सवाचे विधिमंडळात पडसाद
“कामकाजाचं आजचं स्वरुप कसं असेल हे मी आता सांगू शकणार नाही. मुख्यमंत्री यासंबंधी घोषणा करतील. कर्नाटकविरोधातील ठराव तर होणारच आहे, पण याशिवाय सीमाभागासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींबद्दल घोषणा मुख्यमंत्री करतील,” अशी माहिती केसरकर यांनी दिली.
विरोधक पहिल्या दिवशीच ठराव व्हायला हवा होता अशी टीका करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “ज्यांनी काहीच केलं नाही ते असं बोलू शकतात. आम्ही सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव करत नाही. महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे”.
कारवाई होणार?
गायरान जमीन वाटप आणि सिल्लोड महोत्सवाबाबत सत्तार हे मंगळवारी विधिमंडळात आपली बाजू मांडणार आहेत. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांना पाठिशी न घालण्याची भूमिका घेतली. तसेच सत्तार यांच्याविरोधातील दोन्ही सभागृहांतील आरोपांबाबत माहिती घेत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीहून परतताच सांगितले. त्यामुळे सत्तारांवर कारवाई होणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.