नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षाने सरकारच्या नाका तोंडात पाणी आणले. यामुळे मुख्य प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराला लक्ष्य केले जात आहे. सीमावादासंदर्भात सरकारने ठराव मांडला नाही,त्यामुळे २६ डिसेंबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून हा ठराव सभागृहात मांडण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हेही वाचा >>> नागपूर : वाईटच घडले, ‘ली’ने चौथ्यांदाही बछडा गमावला; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी
हिंगणा तहसील कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने झोपडपट्टी व शेतकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे द्यावे, यासाठी माजी पंचायत समिती उपसभापती विलास भोंबले यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी दानवे आले असताना पत्रकारांशी ते बोलत होते.
दानवे पुढे म्हणाले, नागपूर हिवाळी अधिवेशनाला आठवडा पूर्ण झाला आहे. महाविकास आघाडी विरोधी पक्षात असली तरी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी विरोधी पक्षांनी सरकारला अनेक प्रश्न मांडून धारेवर धरले. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूखंडाचा श्रीखंड हा प्रश्न सुद्धा होता. यानंतर कर्नाटक सिमा वादाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना सरकारकडून अद्यापही ठाम भूमिका घेतली जात नाही. आठवडा लोटूनही कर्नाटक सिमा वादाचा ठराव सरकारने मांडला नाही. राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविताना सरकारला अपयश आल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराला लक्ष्य करीत आहे.
हेही वाचा >>> विदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा करोना चाचणीला विरोध; नागपूर महापालिकेची डोकेदुखी वाढली
कर्नाटक सरकारला एक इंचही महाराष्ट्रातील जमीन देण्यात येऊ नये, असा ठराव २३ डिसेंबरला शिवसेनेकडून मांडण्यात येणार होता. मात्र आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन झाल्याने सभागृह स्थगित झाले.यामुळे हा ठराव सभागृहात मांडता आला नाही.मात्र हा ठराव २६ डिसेंबर रोजी विधान परिषदेत मांडण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव, जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे, हिंगणा तालुकाप्रमुख जगदीश कन्हेर, विभाग प्रमुख राजेंद्र कोल्हे, शहर प्रमुख विष्णू कोल्हे, युवा सेनेचे संतोष कन्हेर, माजी पं. स. उपसभापती विलास भोंबले, महिला आघाडीच्या दीपलक्ष्मी लाड उपस्थित होते.