मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभागृहातील अनुपस्थितीवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी जाहीर केली आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा असतानाही मुख्यमंत्री गैरहजर असून त्यांच्याकडे १७ ते १८ खाती आहेत. त्यांच्या वतीने इतर मंत्री उत्तर देत असल्याचं सांगत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. दरम्यान यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला असता सभागृहात एकच हशा पिकला. मात्र या उत्तरामुळे अजित पवार संतापले आणि फडणवीसांना सुनावलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“प्रश्नोत्तराचा दुसरा आठवडा आणि दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांकडे १४-१५ खाती आहेत. त्यांच्या खात्यासंबंधी प्रश्नांची उत्तरं शंभूराज देसाई, उदय सामंत देतात. उत्तरं कोणी द्यायची हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीसजी तुमच्याकडे सात ते आठ खाती आहेत. तुम्ही सगळ्या खात्यांसंबंधी उत्तरं देता. तुम्ही दुसऱ्या कोणाला उत्तर द्यायला सांगत नाही. तुम्ही तितके सक्षम आहात म्हणून देत असाल,” असं अजित पवार म्हणाले. यानंतर सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत असल्याचं म्हटलं.

Maharashtra Assembly Session: अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेणार? शिंदे गटाकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले “आरोप झालेल्या मंत्र्यांनी…”

त्यानंतर अजित पवार म्हणाले की “हा हेतूआरोप नाही. प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री हजर असतील तर प्रशासनावरही एक दबदबा निर्माण होतो. कारण सगळे ३०, ४० दिवस प्रश्न विचारत असतात. एखाद्या दिवशी दिल्लीत महत्त्वाचं काम आहे, त्यावेळी गेले तर समजू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी विधानपरिषदेत थांबले तरीही समजू शकतो. पण नगरविकास खात्यासंबंधी प्रश्न आहे. उल्हासनगरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. उदय सामंत यांनी हे जलसंपदा विभागाकडे असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री असते तर त्यांनी उत्तर दिलं असतं, कारण जलसंपदा विभागही त्यांच्याकडे आहे”.

“देवेंद्र फडणवीसजी तुम्हालाही आठवत असेल की, मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला हजर असले तर इतरांच्या उत्तरात हस्तक्षेप करत न्याय देऊ शकतात. आपण पाच वर्ष तसं करत होतात. ही एक परंपरा, पद्धत आहे. विधिमंडळाला न्याय, सन्मान आहे. आपण कायदे करतो, कायदेमंडळ आहे. कृपा करुन सरकार याची नोंद घेणार आहे का याचंही उत्तर द्या”, असं अजित पवारांनी सांगितलं.

त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना “तुम्ही सभागृह चालू देणार आहे हे माहितीच नव्हतं, अन्यथा मुख्यमंत्री हजर राहिले असते” असा टोला लगावला. त्यावर सत्ताधारी आमदारांमध्ये एकच हशा पिकला. आता सभागृह चालवत आहात तर मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवतो. आपलं म्हणणं योग्य असून मुख्यमंत्री उपस्थित राहतील असंही ते म्हणाले.

मात्र यावरुन अजित पवार संतापले. मग तुम्ही कसे हजर राहिलात? अशी विचारणा त्यांनी फडणवीसांना केली. ते म्हणाले की “मग आपण कसे काय आलात? आपल्याला बरं माहिती असतं. मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचं हे यांचं काम नाही का अशी विचारणाही त्यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. त्यावर फडणवीसांनी सभागृहाचं कामकाज चालू आहे कळल्यावर घाईत आलो असं उत्तर दिलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly winter session ncp ajit pawar gets angry on devendra fadnavis over eknath shinde sgy