राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आल्याने महाविकास आघाडीने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. जयंत पाटील यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी मान्य होत नसल्याने कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान विरोधक विधान परिषदेच्या कामकाजात मात्र सहभागी होणार आहेत.
Jayant Patil Suspension: सभागृहात नेमकं काय घडलं? शरद पवारांचा अजित पवारांना फोन
“जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर आम्ही सभात्याग केला होता. आजही आमची तीच भूमिका राहणार आहे. जयंत पाटील यांचं वागणं, बोलणं, स्वभाव हे गेल्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना सभागृहात बसू दिलं पाहिजे. त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ही मागणी मान्य होत नसल्याने आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकला आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
यावेळी अजित पवारांनी कर्नाटकमधील ठरावाचा मुद्दाही मांडला. ते म्हणाले की “आम्ही मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे ठराव करत असून त्यामुळे बेळगावमधील मराठी माणूस नाराज होत असल्याची माहिती दिली. तिथे महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला जात आहे. तशाच पद्धतीने आपल्याकडे सोमवारी दोन्ही सभागृहात कडक भाषेत ठराव मांडला गेला पाहिजे. आमचं एकमत असल्याने हा ठराव मंजूर करण्यात कोणतीच अडचण नसेल”.
“सभागृहात मिळवणारी वागणूक लोकशाहीसाठी मारक आहे. सत्ताधारी पक्षाला मी कधीच वेलमध्ये येताना, कामकाज बंद पाडताना पाहिलेलं नाही. आम्ही ‘सत्यमेव जयते’च्या बाजूने उभे राहत असून, सत्ताधारींची मात्र ‘सत्तामेव जयते’ची बाजू आहे. ती कधीच जिंकणार नाही. आमचा आवाज कितीही दाबला तरी महाराष्ट्र, भूखंड विकू देणार नाही, कर्नाटकला घाबरणार नाही,” असं आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.