नागपूर : शेतकऱ्यांचा प्रश्नांवर सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे तर शेतकऱ्यांना मदत करण्याचे संकेत देऊन सरकारने विरोधी पक्षाची कोंडी करण्याचे प्रयत्न आहेत. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरूवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनावर अवकाळी पावसाचे सावट आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात सुमारे सव्वा पाच लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच बुधवारी दिवसभर विदर्भात पुन्हा संतधार पाऊस पडला. त्यामुळे विदर्भातील नुकसानीची तीव्रता आणखी वाढणार आहे. अधिवेशनात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेले नुकसान, पंचनामे, मदतीचे निकष आणि पीकविमा भरपाई, आदी मुद्द्यांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाकडे, शरद पवार गट आक्षेप घेणार
राज्याला नुकताच गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला. पुणे, नगर नाशिक जिल्ह्याला गारपिटीचा फटका बसला. नाशिक जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे आकडे वाढतच आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाच डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात ५ लाख २५ हजार ६७१ हेक्टरवर झाले आहे. यवतमाळला मोठा फटका बसला असून, सर्वाधिक १ लाख २६ हजार ४३८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे अजून सुरू असतानाच पुन्हा पूर्व विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
हेही वाचा : गडचिरोली : २ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षल्यास अटक
बुधवारी नागपूरसह परिसरात झालेल्या पावसामुळे काढणीला आलेला भात, तूर, कापसासह फळपिकाचे मोठे नुकसान होणार आहे. अधिवेशनात अवकाळीमुळे झालेले नुकसान, मदतीचे निकष, संथगतीने सुरू असलेले पंचनामे आदी प्रश्नावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. तसेच सरकारलाही शेती प्रश्न गांभीर्याने घ्यावे लागणार आहेत. विदर्भात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे सरकारलाही नुकसान भरपाईबाबत ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.