डॉ. इंद्रजित खांडेकर यांची टीका
बलात्काराचा गुन्हा सिद्ध होण्याबाबत पुरोगामी महाराष्ट्र बिहार आणि उत्तरप्रदेशापेक्षाही मागासलेला असल्याची खोचक टीका सेवाग्राम रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केली.
कमलाताई होस्पेट स्त्री सहाय्यक मंडळ आणि मातृसेवा संघ समाजकार्य महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बलात्कारित आणि छेडखाणपीडित स्त्रियांचे हक्क’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त उपअधीक्षक रमेश मेहता, संस्थेच्या सचिव लता देशमुख, मंडळाच्या अध्यक्ष सुनंदा मोहिनी, अॅड. पल्लवी खरे, अॅड. विवेक पळशीकर आणि प्राचार्य डॉ. जॉन मेनाचेरी होते.
डॉ. खांडेकर म्हणाले, मुळात बालकांना हेच कळत नसते की त्यांच्याशी काहीतरी वाईट होत आहे. बरीच मुले सांगत नाहीत. सांगितले तरी चुकीच्या व्यक्तीला सांगितल्याने तोही बालकाचा गैरफायदा घेतो. सर्वात प्रथम बालकांना त्यांच्याशी नेहमीपेक्षा विपरित घडत असल्याची जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी थोडीफार तरी लैंगिक समज, गुप्त भागांचे ज्ञान त्यांना वेळोवेळी दिले पाहिजे. आपल्याकडे बलात्कारासंबंधी अनेक ‘टाबू’ आहेत. त्यावरही खांडेकरांनी ऊहापोह केला. बालकांवरील अत्याचार असो की बलात्कार असो गुन्हा दाखल करता आला पाहिजे, पोलीस तपास योग्य झाला पाहिजे, न्यायालयीन प्रक्रियेत गुन्हा सिद्ध करता आला पाहिजे आणि सरतेशेवटी आरोपीच्या शिक्षेचा मुद्दा येतो. तो सर्वात गौण आहे. मात्र, निर्भयाकांडानंतर त्याच्यावरच जास्त चर्चा झाली. शिक्षा सात वर्षांची, दहा वर्षांची किंवा फाशी ही चर्चा सोपी आहे. मात्र, गुन्हा सिद्ध करणे कठीण आहे. बरेचदा पुरावे असूनही आरोपी का सुटतो, त्याला न्यायालयीन किंवा पोलीस प्रक्रिया कशी जबाबदार आहे, बलात्कारित स्त्रीवरील अत्याचाराची सुनावणी करतो की तिच्या चारित्र्याची सुनावणी करतो, हेही भान राखले जात नाही. न्यायालयाकडे हा शब्द पोलिसांमार्फत येतो तर पोलिसांकडे डॉक्टरांमार्फत आणि डॉक्टरांनाही शासकीय कागदपत्रांमध्ये हा शब्द सापडतो. आपल्याकडे आरोपीला शिक्षा होणे किंवा गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण बिहार आणि उत्तरप्रदेशपेक्षाही कमी आहे. २०१०-११मध्ये ८ टक्के गुन्हे सिद्ध व्हायचे तर २०१४-१५मध्ये हे प्रमाण १५-१६ टक्के आहे, एवढाच काय तो आनंद.
रमेश मेहता यांनी बलात्कारीत स्त्रियांच्या हक्कांवर भर देत मार्गदर्शन केले. लहान मुलांवरील अत्याचारांच्या बाबतीत बोलताना पल्लवी खरे यांनी गुप्तांगाला कोणी हात लावत असेल तर जोरात ओरडायचे आणि फक्त आईशी यासंबंधीचे हितगूज करायचे यासाठी मुलांना तयार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मंडळाची माहिती आशा मांडे यांनी दिली. संचालन वैशाली बेझलवार यांनी तर शोभा पारळकर यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा