नागपूर : एका ऑडी मोटारीने रविवारी मध्यरात्री शहरात पाच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या मोटारीची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या नावाने आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संकेत यांची मोटार त्यांचा चालक अर्जुन हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) यांना चालवायला दिली होती. याच मोटारीने रविवारी मध्यरात्री पाच वाहनांना धडक दिली. अपघातग्रस्त जितेंद्र सोनकांबळे (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चालक हावरे आणि चिंतमवार यांना अटक केली. पोलिसांनी मोटार जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. त्यावेळी तिची ‘नंबर प्लेट’ काढण्यात आल्याचे उघड झाले. कार कुणाच्या नावावर आहे, याची माहिती वाहतूक कार्यालयाकडून मागविल्याचे पोलीस अधिकारी चंद्रशेखर चकाटे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> नागपूरच्या नंदनवनात देहव्यवसाय फोफावला!; अल्पवयीन मुलींकडून…

चालक कोण

अपघातावेळी नेमके कार कोण चालवत होते, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. संविधान चौकापासून ते सेंट्रल बाजार रोडवरील सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आल्याची चर्चा आहे.

रामदासपेठमध्ये महागड्या ऑडी कारने अनेक गाड्यांना धडक दिली. चंद्रेशखर बावनकुळे यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का? सुषमा अंधारे, प्रवक्त्या, शिवसेना (उबाठा)

कार माझ्या मुलाच्या नावावर आहे. पोलिसांनी नि:ष्पक्ष चौकशी करावी. दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

Story img Loader