आठ जण बचावले * प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

बुलढाणा, नागपूर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका आणि मृत्युतांडव कायम आहे. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल कंपनीच्या बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर बसच्या चालकासह आठ प्रवासी या दुर्घटनेतून बचावले. हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यापासून २०३ दिवसांत ४५० अपघात होऊन ९७ जणांचा बळी गेल्याने सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित झाला आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीची बस नागपूरवरून मुंबईकडे जात असताना पिंपळखुटा गावाजवळ चालकाला झोप अनावर झाल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती आधी एका खांबाला आणि नंतर पुलाच्या कठडय़ाला धडकून उलटली. बस उलटताच डिझेलची टाकी फुटली आणि आगडोंब उसळला. त्यातच बसमधील वातानुकूलन यंत्राचाही स्फोट झाला. दरवाजाच्या बाजूने बस उलटल्याने प्रवासी आतच अडकले आणि काही क्षणांतच २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. चालक, क्लिनरसह आठ जण मात्र बसच्या काचा फोडून जीवाच्या आकांताने बाहेर पडल्याने बचावले.

Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

मोठा गाजावाजा करून लोकार्पण करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर प्रत्येक दुसऱ्या दिवशी एकाचा अपघाती मृत्यू होत आहे. २०३ दिवसांत ९७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ९२१ प्रवासी जखमी झाले आहेत.

‘समृद्धी’च्या नागपूर- शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. महामार्ग सेवेत दाखल होताच अपघातांची मालिका सुरू झाली. एकूण अपघातांमध्ये १६१ गंभीर, तर १६१ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. या अपघातांमध्ये २१५ प्रवासी गंभीर तर ७०६ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

शहरनिहाय मृतांची नावे

वर्धा : तुषार/करण भूतनवरे, तनिशा तायडे, तेजू राऊत, संजिवनी गोठे, सुशील दिनकर खेलकर, राजश्री गांढोळे, राधिका खडसे, श्रेया वंजारी, प्रथमेश खोडे, अवंतिका पोहनकर.

चंद्रपूर : तेजस पोफळे, वृषाली वनकर, शोभा वनकर, ओवी वनकर.

नागपूर : इशांत गुप्ता, गुडिया शेख, रिया सोनपुरे, कौस्तुभ काळे.

यवतमाळ : सृजल सोनोने, निखिल पाते.

वाशीम : मनीषा बहाळे, संजय बहाळे.

पुणे : कैलास गंगावणे, कांचन गंगावणे, सई गंगावणे.

मुलाखतीसाठी निघाला, पण..!

चांगली नोकरी मिळेल, असा विश्वास बाळगून नागपूरच्या बेसा भागात राहणारा कौस्तुभ काळे हा युवक पुण्याला मुलाखतीसाठी शुक्रवारी सायंकाळी बैद्यनाथ चौक येथे बसमध्ये बसला. कौस्तुभचा मामेभाऊ त्याला घेण्यासाठी सकाळी आला होता, मात्र बस आलीच नाही. त्याने चौकशी केल्यावर अपघाताची माहिती मिळाली. कौस्तुभ नागपूरला खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याला दोन बहिणी आणि वृद्ध आई-वडील आहेत. त्यामुळे घरची सगळी जबाबदारी त्याच्यावरच होती. आई -वडिलांचा आशीर्वाद घेऊन आणि बहिणीला सांगून तो निघाला होता..

सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न हिरावले

लहान गावातून उंच भरारी घेण्यासाठी तो पुण्याकडे निघाला. पण, रस्त्यातच स्वप्न भंगले. वर्धा येथील पोलीस वसाहतीसमोर राहणारा प्रथमेश खोडे रात्री ‘‘त्या’’ दुर्दैवी बसमध्ये बसला तोच मुळात खूप मोठे होऊन आईची स्वप्ने पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन. प्रथमेश बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातून चांगले गुण घेत सिव्हिल शाखेत पदवीधर झाला होता. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन मोठा अधिकारी व्हायचे त्याने ठरविले होते. त्यासाठी तो पुण्याला चालला होता..

११ मृतांची ओळख पटली

२५ पैकी ११ मृतांची ओळख पटली आहे. इतरांची ओळख ‘डीएनए टेस्ट’ करून पटविण्यात येणार आहे. यासाठी विविध ठिकाणचे तज्ज्ञ बुलढाण्यात दाखल झाले आहेत.

कारवाईचा धडाका

समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी परिवहन खात्याकडून वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी अपघातांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. १ जुलै २०२३ च्या पहाटेपर्यंत अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या १६७, चुकीच्या मार्गिकांवर धावणाऱ्या १ हजार ९०४, नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २ हजार ९६७, रिफ्लेक्टर नसलेल्या ९३५ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे परिवहन खात्याच्या अहवालातून स्पष्ट झाले.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देताना जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बस चुकीच्या मार्गिकेवर..                                        

परिवहन खात्याच्या प्राथमिक अहवालानुसार, ही बस महामार्गाच्या मध्य मार्गिकेऐवजी उजव्यामार्गिकेवरून धावल्याने अपघात घडला. इंजिन ऑईल आणि डिझेलचा संपर्क होऊन बसने पेट घेतला. टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचा पुरावा आढळला नाही. बस अतिवेगात नव्हती.

अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास : मुख्यमंत्री

समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार प्राधान्याने उपाययोजना अमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अपघातस्थळाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भेट दिली.

उपाययोजनांनंतरही अपयश..

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी कृती आराखडय़ाअंतर्गत विविध उपाययोजना केल्या. २३ वाहनांद्वारे महामार्गावर गस्त घालण्यात येत असून, १२२ सुरक्षा रक्षकांची फौजही तैनात आहे. आतापर्यंत टायर सुस्थितीत नसलेल्या २१ हजार ५३ वाहनांची तपासणी करण्यात आली. टायर योग्य स्थितीत नसल्याने ९२३ वाहनांना महामार्गावर प्रवेश नाकारण्यात आला. मात्र, इतक्या उपाययोजना केल्यानंतरही अपघात रोखण्यात यंत्रणांना यश आलेले नाही.