अमरावती : नागपूर येथे महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ सुरू असताना मंत्रिपदाची संधी हुकलेल्या आमदारांकडून, त्यांच्या स्वकीयांकडून नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी देखील आमदार रवी राणा यांना मंत्रिपद न मिळाल्याने काव्यात्मक ओळी सादर करीत एका पोस्टमधून नाराजी व्यक्त केली आहे.
“समंदर को क्या गम है, वो बता भी नहीं सकता.. पाणी बनकर आंखो में आ भी नहीं सकता, जिंदगी है… लडाई जारी है……”, अशा ओळी म्हणत नवनीत राणा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हीडिओ त्यांनी त्यांच्या एक्स या अकाऊंटवर देखील अपलोड केला आहे. त्यांच्या या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे.
नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली होती. पण, विधानसभा निवडणूक काळात नवनीत राणा यांनी प्रचाराची धुरा हाती घेत अनेक मतदारसंघांमध्ये भाजपचा आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ जागांपैकी भाजपला पाच जागा मिळाल्या. दुसरीकडे, युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिला होता. तेही निवडून आले. रवी राणा हे चौथ्यांदा निवडून आल्याने त्यांचा मंत्रिपदावर हक्क असल्याचे सांगून राणा समर्थकांनी दबावतंत्राचा वापर गेल्या काही दिवसांपासून केला. पण, त्यात त्यांना यश मिळाले नाही.
हेही वाचा >>> मंत्रिमंडळात यवतमाळ जिल्ह्याची हॅटट्रिक; महायुतीतील तिन्ही पक्षांना स्थान
रवी राणा यांची मंत्रिपदाची संधी हुकल्याने युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यातच आता नवनीत राणा यांनी समाज माध्यमांवर व्यक्त होत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जीवन आहे, संघर्ष सुरू आहे, असे म्हणत त्यांनी ताज्या घडामोडींवर भाष्य केले आहे. त्यांच्या शब्दातून रवी राणांना डावलल्याची खंत व्यक्त झाली आहे.
हेही वाचा >>> पूर्व विदर्भातील चार जिल्हे मंत्रीपदापासून वंचित राहणार
रवी राणा यांच्या समर्थकांनी गेल्या काही दिवसांत रवी राणांना हमखास मंत्रिपद मिळेल, अशी फलकबाजी केली होती. येथील अंबादेवी आणि एकवीरा देवीच्या मंदिरात प्रार्थना आणि महाआरती देखील करण्यात आली, पण ती फळाला आली नाही. रवी राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात. त्यामुहे त्यांची यावेळी मंत्रिमंडळात नक्की वर्णी लागेल आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यांच्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा राणा समर्थक बाळगून होते. पण, यावेळीही त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.
© The Indian Express (P) Ltd