गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विदर्भातील ज्येष्ठ नेते तथा मागील सरकारमधील अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नव्या सरकारमध्ये स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.आदिवासी समाजाचे नेते आणि अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून त्यांना ओळखल्या जाते. तरीही ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडल्याने यामागे वर्षभरापूर्वी प्रफुल पटेलांसोबत झालेल्या वादाची किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील वरिष्ठ नेत्यांच्या यादीतील महत्वाचे आदिवासी नेते म्हणून ओळख असलेले आणि अहेरी येथील आत्राम राजघराण्यातील ज्येष्ठ सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांना नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नाही. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुलगी आणि पुतण्याचा पराभव करीत ते निवडून आले. आमदार म्हणून त्यांची ही पाचवी वेळ.
हेही वाचा >>> विरोधी पक्षाने ही कारणे देत टाकला चहापानावर बहिष्कार
तीनदा राज्यमंत्री आणि मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री अशी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट अजित पवारांच्या नेतृत्वात वेगळा झाला. त्यावेळी आत्राम यांनी अजित पवारांची साथ दिली. याचे बक्षीस म्हणून त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. यादरम्यान त्यांच्याकडे अजित पवार गटाचे महत्वाचे नेते प्रफुल पटेल यांचा गृहजिल्हा गोंदियाचे पालकमंत्री पद देण्यात आले होते.
या कार्यकाळात पटेल समर्थकांच्या अवाजवी दबावामुळे पटेल आणि आत्राम यांच्यात खटके उडाल्याची चर्चा होती. त्यामुळे आत्राम यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. नंतर त्यांनी तो मागेही घेतला. या वादाची राजकीय वर्तुळात चंगलीच चर्चा होती. तेव्हापासून पटेल आणि आत्राम यांच्यात वितुष्ट आल्याचे बोलल्या जाते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या वादाची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रीमंडळात घेण्यास पटेल यांचा विरोध असल्याचे बोलल्या जाते. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांनी आत्राम यांना निवडून द्या त्यांना पुन्हा मंत्री करू असे बोलले होते.
हेही वाचा >>> अमरावती : रवी राणांना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची हुलकावणी
त्यामुळे नव्या सरकारमध्ये आत्राम यांना मंत्रीपद निश्चित असल्याचे सांगितले जात होते. संभाव्य यादीत त्यांचे नाव देखील होते. परंतु ऐनवेळेवर त्यांना वगळण्यात आले. त्यामुळे यामागे पटेल आणि आत्राम वाद असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे.
गडचिरोलीचे पालकमंत्री पद कुणाकडे?
धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रीमंडळात संधी न मिळल्याने आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याने गडचिरोलीचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात होऊ घातलेले मोठे प्रकल्प व त्यावर आधारित सुरु असलेले उद्योग यामुळे गडचिरोलीकडे अनेक नेत्यांचे लक्ष आहे. त्यामुळे गडचिरोलीचे पालकमंत्री फडणवीस स्वतःकडेच ठेवणार अशी चर्चा आहे.