नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या विदर्भाचे प्रतिनिधीत्व करतात त्यांच्या मंत्रीमंडळात पूर्व विदर्भातील चार जिल्हे मंत्रिपदापासून वंचित आहेत. यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर  आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. शिंदे मंत्रिमंडळात चंद्रपूरमधून  सुधीर मुनगंटीवार व गडचिरोली जिल्ह्यातून धर्मरावबाबा आत्राम मंत्री होते. भाजप नेते मुनगंटीवार वनमंत्री होते तर राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री होते. हे दोन्ही नेते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांचा मंत्री म्हणून अनुभव  लक्षात घेता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश नक्की मानला जात होता. पण त्यांना पहिल्या यादीत समावेश नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

भंडारा जिल्ह्यातून शिंदे सेनेचे नरेंद्र भोंडेकर मंत्रीपदासाठी आस लावून बसले होते. पण त्यांनाही संधी मिळाली नाही. गोंदिया जिल्ह्यातूनही कोणालाही मंत्री करण्यात आले नाही. पूर्व विदर्भातून भाजपला विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाले होते. पण मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यात एकूण ३९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यात विदर्भातील सात जणांचा समावेश आहे. चार भाजपचे, दोन शिंदे गटाचे तर एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रीमंडळातून वगळले; प्रफुल पटेलांसोबतच्या ‘त्या’ वादाची किनार…

नागपूर जिल्ह्यातून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), पंकज भोयर (वर्धा),  अशोक उईके (राळेगाव) आणि आकाश फुंडकर (खामगाव) या चौघांचा भाजपकडून शपथविधी झाला. शिवसेनेकडून आशीष जयस्वाल (रामटेक), संजय राठोड (पुसद) तर राष्ट्रवादी (अजित पवार)कडून इंद्रनील नाईक (पुसद) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यातील चंद्रशेखर बावनकुळे २०१४ ते २०१९ मध्ये मंत्री होते.  संजय राठोड महाविकास आघाडी व नंतर महायुतीच्या मंत्रिमंडळात होते. इतर सर्व प्रथमच मंत्री झाले आहेत. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम  यांना यावेळी संधी नाकारण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet expansion four districts of east vidarbha will be deprived of ministerial posts cwb 76 zws