अकोला : राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यावरून अकोला व वाशीम जिल्ह्याची पुन्हा एकदा उपेक्षा झाली आहे. मंत्रिमंडळात दोन्ही जिल्ह्यातील एकाही आमदाराला स्थान मिळाले नाही. गेल्या पाच वर्षांत अकोला जिल्ह्याला पार्सल पालकमंत्रीच लाभले. आता फडणवीस सरकारमध्ये देखील पुन्हा अकोला व वाशीम जिल्ह्याच्या नशिबी पार्सल पालकमंत्रीच येणार आहेत.

अकोला जिल्ह्याला २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. पाच वर्षांपासून जिल्ह्याला मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले. पालकमंत्री म्हणून बच्चू कडू अकोला जिल्ह्यात चांगलेच सक्रिय होते. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महायुती सरकारमध्ये जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची आशा फोल ठरली. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकत्व असल्याने अकोल्याला ते फारसे वेळ देऊ शकले नव्हते. त्यानंतर पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामकाज सांभाळले.

हेही वाचा >>> नागपूर : अजित पवार म्हणाले, ‘काही खर्च टाळता येत नाही’ ; ‘लाडकी बहिण’च्या भवितव्याबाबत…

आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला, वाशीम जिल्ह्यातून भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. त्यातील अनेक आमदारांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली, तर काहींनी विजयाचा चौकार देखील लगावला आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातून अकोला पूर्वचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांचे नाव चांगलचे चर्चेत होते. आ.सावरकरांनी हॅट्ट्रिकचा इतिहास करण्यासोबतच ५० हजार ६१३ मताधिक्यासह शिवसेना ठाकरे गट व वंचितचा चितपट केले. देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात त्यांच्या नावाचा विचार झालेला नाही. मूर्तिजापूर मतदारसंघातून भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी सलग विजयाचा चौकार लगावला. अकोट मतदारसंघात विजयी होण्याची प्रकाश भारसाकळेंनी हॅट्ट्रिक केली. मंत्रिपदासाठी हरीश पिंपळे व प्रकाश भारसाकळे यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र, त्यांची देखील निराशा झाली. वाशीम जिल्ह्यातील भाजपचे दोन्ही आमदार पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे वाशीम जिल्ह्याला भाजपच्या कोट्यातून मंत्रिपदाची शक्यता नव्हतीच. इतर जिल्ह्याच्या मंत्र्यांवरच दोन्ही जिल्ह्याच पालकत्व येणार आहे.

हेही वाचा >>> “जिंदगी है… लडाई जारी है…”, काव्‍यात्‍मक पोस्‍टमधून नवनीत राणांनी व्‍यक्‍त केली नाराजी

शिवसेना कोट्यातूनही मंत्री नाहीच

शिवसेना शिंदे गटाला बाळापूर, रिसोड, मेहकर, सिंदखेड राजा येथे मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. बुलढाण्याची जागा काठावर निघाल्याने पक्षाची लाज राखल्या गेली. रिसोड मतदारसंघात पराभव होऊन तिसऱ्या स्थानावर घसरल्यानंतरही विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांनी मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, शिवसेनेने त्यांना मंत्रिपदावर संधी दिलेली नाही.

Story img Loader