चंद्रपूर : सलग सात विधानसभा निवडणुका जिंकणारे विदर्भातील भाजपचे एकमेव ज्येष्ठ नेते तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तीन व दोन वेळा निवडून आलेले अनुक्रमे किर्तीकुमार भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाही, याबाबत दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू होती.
हेही वाचा >>> गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रीमंडळातून वगळले; प्रफुल पटेलांसोबतच्या ‘त्या’ वादाची किनार…
१९९० नंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात भोपळा
१९९० नंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात भोपळा मिळाला आहे. चंद्रपूर जिल्हा हा भाजपचे अभ्यासू नेते आमदार मुगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील आजवरच्या चांगल्या कामगिरीमुळे ओळखला जातो. राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय असो, की वाघांच्या स्थलांतरणाचा विषय, मुनगंटीवार यांनी आपल्या कामाची छाप साेडली. शिलकीचे अंदाजपत्रक सादर करणारे एकमेव अर्थमंत्री म्हणूनही मुनगंटीवार यांच्याकडे बघितले जाते. जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत, त्यापैकी किमान मुनगंटीवार मंत्री होतील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मुनगंटीवार यांना स्थान दिले गेले नाही. त्यामुळे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे दु:खावले आहेत.
हेही वाचा >>> विरोधी पक्षाने ही कारणे देत टाकला चहापानावर बहिष्कार
‘पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू’
१९९५ च्या भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये मुनगंटीवार प्रथम सांस्कृतिक मंत्री झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ तथा वन खात्याची जबाबदारी होती. २०२२ मध्ये त्यांच्याकडे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय खाते तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आले होते. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसले तरी पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.
भांगडिया, जोरगेवारांनाही मंत्रिपदाची हुलकावणी
मुनगंटीवार यांच्याप्रमाणेच चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत, तर चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यामुळे युवा मंत्रिमंडळात भांगडिया किंवा जोरगेवार यांच्यापैकी एकाला संधी मिळेल, अशी आशा भाजप कार्यकर्ते व्यक्त करीत होते. मात्र, या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.
पालकमंत्री कोण?
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील मंत्र्यांकडेच होते. मात्र आता चंद्रपूरला मंत्रिमंडळात भोपळा मिळाल्याने पालकमंत्री कोण असतील, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जिल्ह्याला आयात पालकमंत्री मिळाल्यास भाजप कार्यकर्त्यांमधील नाराजी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.