नागपूर : विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यावर या भूप्रदेशाकडे महायुती सरकारचे अधिक लक्ष असणार हे मंत्रिमंडळातील या भागातील सदस्य संख्येवरून स्पष्ट होते. विदर्भाची राजधानी व राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) आणि आशीष जयस्वाल (शिवसेना-शिंदे) या तिघांचा तर विदर्भाचा विचार केला तर एकूण सात जणांचा समावेश समावेश आहे..
सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यात एकूण ३९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यात विदर्भातील सात जणांचा समावेश आहे. चार भाजपचे, दोन शिंदे गटाचे तर एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> Devendra Fadnavis : “पूर्वी जमिनीवर होतो यापुढेही जमिनीवर…”, देवाभाऊंचे गृहशहरात जल्लोषात स्वागत
नागपूर जिल्ह्यातून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), पंकज भोयर (वर्धा), अशोक उईके (राळेगाव) आणि आकाश फुंडकर (खामगाव) या चौघांचा भाजपकडून शपथविधी झाला. शिवसेनेकडून आशीष जयस्वाल (रामटेक), संजय राठोड (पुसद) तर राष्ट्रवादी (अजित पवार)कडून इंद्रनील नाईक (पुसद) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
हेही वाचा >>> Ajit Pawar : “…परंतु काही गोष्टी” अजित पवारांनी सांगितले आमदारांची संख्या न वाढण्यामागचे कारण
यातील चंद्रशेखर बावनकुळे २०१४ ते २०१९ मध्ये मंत्री होते. संजय राठोड महाविकास आघाडी व नंतर महायुतीच्या मंत्रिमंडळात होते. इतर सर्व प्रथमच मंत्री झाले आहेत. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम यांना यावेळी संधी नाकारण्यात आली.
भोंडेकर नाराज
फडणवीस सरकारमध्ये मंत्री होऊ अशी अपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना होती. मात्र त्यांचे नाव पहिल्या यादीत नसल्याने ते नाराज झाले असून त्यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.