अमरावती : पाच वर्षांपुर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये अमरावती जिल्ह्याला दोन मंत्रिपदांचे बक्षीस मिळाले खरे, पण महायुती सरकारच्या काळात दोन्ही वेळा जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालेले नाही. यावेळी बडनेराचे युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांचे समर्थक उत्साहात होते. रवी राणांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती, पण दुसऱ्यांदा त्यांचे मंत्रिपद हुकल्याने युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे.
राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तत्कालीन तिवसाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि अचलपूरचे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळाले होते. यशोमती ठाकूर यांना अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून तर बच्चू कडू यांना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.
हेही वाचा >>> नागपूर : लाडक्या बहिणींना सरसकट २१०० रुपये कधी मिळणार? अटी, शर्थींवरून विरोधकांचा…
अडीच वर्षांपुर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ऑगस्टमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यावेळी सरकारला पाठिंबा देणारे रवी राणा यांना मंत्रिपदाची संधी मिळणार, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला होता.
पण, त्याचवेळी प्रहारचे बच्चू कडू यांनीही महायुती सरकारला पाठिंबा दिला असल्याने तेही त्यावेळी शर्यतीत होते. दोघांमध्ये त्यावेळी चांगलेच वैर उफाळून आले होते. बच्चू कडू हे अडीच वर्षे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेतच राहिले आणि रवी राणांना देखील मंत्रिपदाची हुलकावणी मिळाली.
महायुती सरकारच्या दोन्ही कार्यकाळात जिल्ह्यात मंत्रिपदाची पाटी कोरीच आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातून आठपैकी चार आमदार देणाऱ्या अमरावती जिल्ह्याला भाजपकडून मंत्रिपदाची पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे.
रवी राणा यांच्यासोबतच तिसऱ्यांदा निवडून आलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुलभा खोडके आणि दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे प्रताप अडसड हे मंत्रिपदाच्या स्पर्धेत होते, पण दोघांनाही यावेळी संधी मिळालेली नाही.
हेही वाचा >>> विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करावा लागतो का? नाना पटाले अध्यक्षांना सवाल म्हणाले….
रवी राणा समर्थकांचा अपेक्षाभंग गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा यांच्या समर्थकांकडून रवी राणांना हमखास अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळेल, असा दावा करण्यात येत होता. त्यासाठी त्यांनी केलेली फलकबाजी देखील चर्चेत आली होती. गेल्या १० डिसेंबरला रवी राणांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, यासाठी येथील अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिरात महाआरती करण्यात आली होती. यावेळी अॅड सागर महाराज देशमुख, चंद्रकुमार जाजोदिया, सुनील राणा आदी उपस्थित होते. यावेळी राणांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
© The Indian Express (P) Ltd