प्रगत आणि पुरोगामी म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या महाराष्ट्राची आणखी एक नवी ओळख आर्थिक फसवणुकीच्या क्षेत्रात पुढे येत आहे. या क्षेत्रातील गुन्हेगारीत महाराष्ट्र संपूर्ण देशात तिसऱ्या क्रमांकवर असल्याचे नॅशनल क्राईम ब्युरोच्या २०१४ च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्य़ांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर (२६,२२१ गुन्हे), उत्तर प्रदेश (१५,३९० गुन्हे) दुसऱ्या, तर महाराष्ट्र (१३,४११ गुन्हे) तिसऱ्या क्रमांकावर आहे. फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात आणि तत्सम प्रकारच्या गुन्ह्य़ांचा यात समावेश आहे. गुन्हेगारीच्या क्षेत्रात काहीही झाले तरी बिहार, उत्तर प्रदेशचे नाव पुढे येते. महाराष्ट्राचा बिहार किंवा उत्तर प्रदेश झाला, अशी टीका राजकारणात विरोधी पक्ष नेहमीच करीत असतो. मात्र, फसवणुकीच्या क्षेत्रातील गुन्हेगारीत महाराष्ट्र बिहारच्याही पुढे आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील गुन्ह्य़ांच्या संख्येत विशेष असा फरक नाही.
संपूर्ण देशात महाराष्ट्र प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातही राज्याचे नाव देशपातळीवर आहे. मात्र, अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या क्षेत्रातही राज्य अग्रस्थानी येऊ पहात आहे. आर्थिक क्षेत्रातील गुन्हेगारीची आकडेवारी हे राज्याची या दिशेने होत असलेली वाटचालच दर्शविते. केंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारीतील नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या २०१४ च्या आकडेवारीनुसार या वर्षांत देशभरात एकूण १ लाख ३६ हजार ३४४ आर्थिक फसवणुकीच्या घटना घडल्या. राजस्थान अग्रस्थानी आहेत.
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. या क्षेत्रातील राज्याचे ठळक स्थान यासाठी धक्कादायक आहे की, शेजारच्या मध्यप्रदेशात (२७२१), आंध्रप्रदेश (५०९१), छत्तीसगड (११८०) या राज्यात तुलनेने हे प्रमाण फारच कमी आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल क्रमांक पश्चिम बंगालचा (९४१३), , तेलंगणा (७९८३), कर्नाटक (७७७२), बिहार (७६८५) या राज्यांचा आहे. त्या खालोखाल केरळ (६६७९), तामिळनाडू (५७०७) चा क्रमांक आहे. त्यानंतर पंजाब (४०७३), झारखंड (३००७), हरयाणा (३४१७), गुजरात (२९८६), ओदिशा (२७८८) ही राज्ये येतात. छोटय़ा राज्यांपैकी, उत्तराखंड (७३६), गोवा (३६६), हिमाचल प्रदेश (५६९), जम्मू काश्मीर (६३०), मणिपूर (१७१), मेघालय (२८३), मिझोरम (९१), नागालॅन्ड (८६), सिक्कीम (५७), त्रिपुरा (२१७) मध्ये गुन्ह्य़ांची नोंद कमी आहे.
महाराष्ट्रातील एकूण १३,४११ गुन्ह्य़ांमध्ये विश्वासघात करण्याच्या घटना १९५८, फसवणूक करणे ९९५९, बनावट कागदपत्रांव्दारे फसवणूक १२९३, तत्सम प्रकारचे २०१ गुन्ह्य़ांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या योजना जाहीर करून व जास्त रक्कम देण्याचे आमिष दाखवून किंवा अंधश्रद्धेतून लोकांची फसवणूक करण्याचे प्रमाण राज्यात अधिक आहे. अचल संपत्तीच्या संदर्भात फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर अलीकडच्या काळात सर्रास केला जात आहे. यात गरीब व भोळ्या नागरिकांची फसवणूक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा