मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. परंतु राज्याला ‘कबरी’पासून ‘कामरा’पर्यंत नेणारे हे अधिवेशन होते. या पलिकडे अधिवेशनात काहीही झाले नाही, अशी बोचरी टीका विरोधी पक्षांनी केली. विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, ‘शेतकरी, कामगार, अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा झाली, परंतु विरोधकांच्या डोक्यात कबर आणि कामराच असेल तर आम्ही काय करणार? त्यांच्या डोक्यात तेवढेच जाते, आमच्यासाठी कबर आणि कामरापेक्षा राज्यातील १३ कोटी लोक महत्त्वाचे आहेत, त्यांच्यासाठी आम्ही निर्णय घेतले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्यांना आम्ही पूर्ण वाव दिला, त्यांचे ऐकून घेतले, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. अनेक धोरणे असलेला अर्थसंकल्प संमत केल्याने राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अधिवेशनात लक्षवेधी सूचना वाढल्याने विरोधकांनी हरकत घेतली होती. ‘लक्षवेधी वाढल्या तरी हरकत नाही, पण निकषात बसणाऱ्या लक्षवेधी चर्चेला याव्यात, निकषाच्या बाहेरच्या येऊ नये,’ अशी विनंती आम्ही अध्यक्षांना करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.

घटनाबाह्य नाही, २३५चे सरकार : शिंदे

राज्य सरकारने सर्व योजना, विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना सुरू ठेवून कुठेही अर्थव्यवस्था बिघडू दिली नाही, विरोधकांना चिंता होती आता सगळ्या योजना बंद होणार, विकास प्रकल्प बंद होणार, पगार कसा देणार, पण महायुती सरकारची ही इनिंग धडाक्यात सुरू झाली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विकासाचा वेग कमी न करता आम्ही कामाला प्राधान्य दिले आहे. आता घटनाबाह्य सरकार नाही, २३५ चे सरकार आहे, असा टोलाही शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

‘विरोधीपक्ष निवडीचा अधिकार अध्यक्षांना’

विरोधी पक्षनेता निवड कधी होणार? असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. विधानसभा अध्यक्ष स्वतंत्र आहेत. अध्यक्षांनी निर्णय घेतला तर आमची तयारी असल्याचे फडणवीस म्हणाले.