राज्याच्या राजकारणात पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे तशी दुर्मिळ बाब. पक्षपातळीवर सक्रिय असलेल्या प्रत्येकाच्याच नशिबात तसा योग येत नाही. हे लक्षात घेतले तर चंद्रशेखर बावनकुळे व नाना पटोले तसे नशीबवान म्हणायला हवे. पाच वर्षांपूर्वी बावनकुळेंना पक्षाने उमेदवारी नाकारली तेव्हा त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले होते. आता काय, असा प्रश्न आ वासून त्यांच्यासमोर उभा होता. राजकारणात राहायचे की हे क्षेत्रच सोडून द्यायचे अशा द्विधा मनस्थितीत ते बराच काळ होते. अनेकांनी तेव्हा त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याचा सल्ला दिला. त्याकडे दुर्लक्ष करून बावनकुळे शांत राहिले. ही शांतता राजकारणात अनेकदा फायद्याची ठरत असते. नेमके तेच त्यांच्या बाबतीत घडले व थेट प्रदेशाध्यक्षपदाची लॉटरी त्यांना लागली. ज्या बावनकुळेंना दिल्लीतील श्रेष्ठी समोर उभे करायला तयार नव्हते त्यांच्याशीच नंतर खलबते करू लागले. तिथून सुरू झालेले त्यांचे पर्व आता यशाच्या अत्युच्च शिखरावर येऊन थांबले आहे. भाजपच्या राज्यात तसेच विदर्भात मिळालेल्या दणदणीत यशात देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांचा वाटा मोठा असला तरी बावनकुळेंची मेहनत अजिबात दुर्लक्ष करता येण्याजोगी नाही. पद सांभाळल्यानंतर प्रारंभीची काही वर्षे यशाने त्यांना अनेकदा हुलकावणी दिली. पोटनिवडणुका असोत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. निर्भेळ म्हणावे असे यश काही केल्या त्यांच्या पदरी पडत नव्हते. अर्थात त्याकडे दुर्लक्ष करून ते पायाला भिंगरी लागल्यागत राज्यभर फिरत राहिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’

पराभवाचे मूल्यमापन नेहमी बोचणारे असते. लोकांना चुका काढण्याची संधी मिळवून देते. त्यांच्याही बाबतीत हे घडले. ते एकटेच सुसाट धावतात. संघटनेला सोबत घेऊन चालत नाहीत. पक्षातील इतर नेत्यांना विश्वासात घेत नाहीत अशी कुजबूज त्यांच्याबाबतीत सुरू झाली. नंतर लोकसभेची निवडणूक आली. ती खरी कसोटी होती. त्यात पक्षाला अजिबात यश मिळाले नाही. हे अपयश बावनकुळेंसकट साऱ्याच नेत्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे होते. मतदान कमी झाले, मतदारांना बाहेर काढण्यात संघटना कमी पडली. जातीचे समीकरण जुळवता आले नाही. सारे कार्यकर्ते व पदाधिकारी मोदींवर अवलंबून राहिले अशी टीका बावनकुळेंवर झाली. तरीही ते अविचल राहिले. अपयश हीच यशाची पहिली पायरी असते असे म्हणतात. नेमके तेच त्यांच्याबाबतीत घडले व विधानसभेतील यशाने आधीचे सारे अपयशाचे डाग धुवून निघाले. अर्थात या यशाचे सारे श्रेय आपले एकट्याचे नाही याची जाणीव बावनकुळेंना नक्की असेल पण नेतृत्व म्हणून त्यांची मेहनत कुणीही दुर्लक्षणार नाही हे सत्यही सर्वांना मान्य करावे लागेल. लोकसभेतील पराभवाचे शल्य क्षणात विसरून ते पुन्हा राज्यभर फिरले. शंभरपेक्षा जास्त सभा घेतल्या. बिघडलेली जातीय समीकरणे जुळवून आणली. संघटनेतील गाफीलपणा संपवला. सोबतीला संघपरिवार होताच. त्याचा परिणाम मतदान वाढण्यात झाला. परिणामी पक्षाला फायदा मिळाला.

आता नाना पटोलेंचे बघू. आधी काँग्रेस, मग भाजप व पुन्हा काँग्रेस असा प्रवास करून आलेले पटोले पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मोदींशी घेतलेला पंगा त्यांना राहुल गांधींच्या जवळ नेण्यात कारणीभूत ठरला. जातीय समीकरणात चपखल बसणारे, सोबत आक्रमकतेची जोड असलेले नाना पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देतील अशी आशा अनेकांना होती. तशी चुणूकही त्यांनी अनेकदा दाखवली. पदवीधर, शिक्षक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळत गेले. पक्षातील सारे महत्त्वाचे नेते एकीकडे व नाना आणि त्यांनी तयार केलेला कंपू दुसरीकडे असे चित्र वारंवार दिसत असूनही त्यांना मिळालेल्या यशामुळे ही दुफळी झाकली गेली. यातून तयार झाला तो नाना नशीबवान या मिथकाचा जन्म. यात ते एवढे गुरफटले गेले की त्यांची जमिनीशी असलेली नाळच तुटली. ती कधी हे त्यांनाही कळले नाही. भाजपकडून होत असलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाला प्रत्युत्तर म्हणून जातीय समीकरणाचे नवे गणित त्यांनी लोकसभेत जुळवले. याला मराठा विरुद्ध ओबीसी वादाची किनार होती. ती फायद्याची ठरली. या यशाने नाना जे हवेत उडाले ते यावेळच्या निकालानंतरच खाली आले. प्रत्येक निवडणूक, त्यात जुळणारी समीकरणे, मतदारांची विचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते हेच ते विसरून गेले. लोकसभेत जुळवून आणलेल्या समीकरणाची भाजपने पार मोडतोड केली हेही त्यांना समजले नाही. या काळात ते मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने बघण्यात गर्क होते. ते साकार करायचे असेल तर मोठ्या संख्येत आमदार निवडून आणावे लागतात याचाही विसर त्यांना पडला.

उमेदवारी देण्यावरून होणारी साठमारी हा काँग्रेससाठी तसा नवा विषय नाही. जेव्हा वातावरण अनुकूल असते तेव्हा यात वाढ होत असते. त्यामुळे कुणाला उमेदवारी दिली याचा पूर्ण दोष नानांच्या माथी मारता येणार नाही पण जे उमेदवार दिले त्यांचा प्रचार करणे, त्यांच्यामागे संघटनात्मक ताकद उभी करणे हे काम नाना नक्की करू शकले असते. ते त्यांनी केले नाही. प्रचाराच्या काळात नाना नेमके कुठे होते याचे ठाम उत्तर या पक्षातला एकही नेता आजसुद्धा देऊ शकत नाही. बावनकुळे दिवसाला चार ते पाच सभा करत असताना नाना किती सभा घेत होते याचीही माहिती कुणी देत नाही. निवडणूक काळात या दोन्ही अध्यक्षांच्या दिमतीला हेलिकॉप्टर, छोटे विमान होते. तरीही नाना प्रचारात कमी पडले. का याचे उत्तर कुणाकडे नाही. ते स्वत:च्या मतदारसंघात शेवटच्या दिवशी गेले हे योग्यच पण इतरत्र त्यांच्या सभांचा झंझावात कुठे दिसला नाही. मतदारांना गृहीत धरण्याची चूक त्यांना नडली. बूथ व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवणे ही पूर्णपणे अध्यक्षाच्या अखत्यारितील बाब. तीही त्यांना नीट पार पाडता आली नाही. अनेक ठिकाणी पराजय दिसू लागताच मतमोजणीसाठी नेमलेले कार्यकर्ते केंद्राबाहेर पडले. हे व्यवस्थापन करणाऱ्या अनेक कंपन्या पक्षाच्या दारात उभ्या होत्या पण त्यांचीही मदत नानांनी घेतली नाही. दिवसा स्वप्न बघण्याची जबर किंमत नानांना मोजावी लागली. त्यांच्या गृहजिल्ह्यात म्हणजे भंडारा-गोंदियात सातपैकी सहा जागा महायुतीने पटकावल्या. त्यांच्याच जिल्ह्यात त्यांनी केलेली उमेदवारांची निवड चुकली. दोन प्रदेशाध्यक्षांमधला हा फरक लक्षात घेण्यासारखा. यावेळी बावनकुळे प्रावीण्यश्रेणीत उत्तीर्ण झाले तर नाना चक्क नापास. दोघेही विदर्भाचे. त्यामुळे या भागात कोण बाजी मारतो याकडे साऱ्यांचे लक्ष होते. नानांनी हा सामना हातचा घालवला. हाराकारी करणे म्हणतात ते याला. यश मिळो वा अपयश, नेत्याने कायम जमिनीवरच राहणे केव्हाही योग्य. त्याकडे दुर्लक्ष करणे नानांना भोवले तर बावनकुळेंनी बाजी मारली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra congress chief nana patole and chandrashekhar bawankule role in success of bjp in vidarbha zws