बुलढाणा : प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून बडेजाव मिरवणाऱ्या जिल्ह्यातील ९ नेत्यांवर आता प्रदेश व जिल्हा काँग्रेस समितीची करडी नजर राहणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्राद्वारे दांडीबहाद्दर पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहे. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी पक्षाच्या आंदोलनात गैरहजर असतात किंवा आलेच तर एकटे येतात, असे प्रदेश काँग्रेसच्या निदर्शनास आले आहे. यामुळे या नेत्यांनी आता आंदोलनात स्वतः सहभागी होणे व सोबत किमान ४० कार्यकर्ते आणणे अपेक्षित असल्याचे पत्रात नमूद आहे.
हेही वाचा >>> गोड बातमी….कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘पाळणा’ हलणार ! तब्बल सात दशकानंतर भारतात चित्त्यांच्या जन्माचे वेध
यावर जिल्हा काँग्रेसने नजर ठेऊन याचे पालन न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची तक्रारवजा माहिती प्रदेश काँग्रेसला काळविण्याचे आदेश बजावण्यात आले आहे. त्यामुळे राज्याप्रमाणेच जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारीदेखील पक्षाच्या रडारवर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दिल्ली दरबारी वजन असलेले ज्येष्ठ नेते खासदार मुकुल वासनिक यांचा जिल्हा म्हणून बुलढाणा ओळखला जातो. यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये जिल्ह्यातील ९ नेत्यांचा समावेश आहे. यात श्याम उमाळकर (मेहकर), विजय अंभोरे, संजय राठोड, जयश्री शेळके, गणेश पाटील ( बुलढाणा), रामविजय बुरुंगले ( शेगाव), हाजी दादूसेठ (चिखली) , धनंजय देशमुख ( खामगाव) व स्वाती वाकेकर ( जळगाव) यांचा समावेश आहे. या नेत्यांना आता या निर्देशांचे पालन करावेच लागेल, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनाही आंदोलन व पक्ष कार्यक्रमाप्रसंगी या नेत्यांवर नजर ठेवावी लागणार आहे. तसेच त्यांच्या सोबतच्या चाळीस कार्यकर्त्यांची मोजणी करावी लागणार आहे.