स्वतंत्र विदर्भाचे समर्थक आणि विरोधकांनी परस्परांना आव्हान देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात फडकाविण्यात आलेल्या विविधरंगी ध्वजांनी नागपुरातील महाराष्ट्र दिन चांगलाच गाजला.
आज, १ मे हा महाराष्ट्राचा स्थापना दिवस, हा दिवस दरवर्षी संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला जातो, तसात तो दरवर्षी नागपुरातही साजरा केला जातो. पूर्वी यानिमित्त शासकीय कार्यक्रमासह इतरही साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहायची. त्यानंतर हा दिवस फक्त शासकीय कार्यक्रमांपुरताच मर्यादित राहिला. गत काही वर्षांत स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा पुढे आल्याने व ही मागणी रेटून धरण्यासाठी विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्ताची निवड केल्यापासून हा दिवस विदर्भ समर्थक आणि विरोधक यांच्या परस्पर विरोधी आंदोलनामुळे गाजू लागला. यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरले नाही. विदर्भ समर्थक आणि विरोधक अशा दोन गटात महाराष्ट्र दिन विभागला गेला. विविधरंगी ध्वज यंदाचे वैशिष्टय़ ठरले. विदर्भ समर्थकांनी सहा रंगाचा विदर्भध्वज फडकाविला. विदर्भ विरोधक मनसेने त्यांच्या पक्षाचा, तर शिवसेनेने भगवा ध्वज फडकावून महाराष्ट्र दिन साजरा केला. सरकारी कार्यक्रमात तिरंगा फडकाविण्यात आला. शेतकरी संघटनेनेही व्हरायटी चौकात त्यांच्या संघटनेचा ध्वज हाती घेतला. विदर्भवाद्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या प्रमुख सुलेखा कुंभारे यांच्या कपाळावरची निळी पट्टी सर्वाचे लक्ष वेधून घेणारी होती. याशिवाय, विदर्भवाद्यांनी लावलेले निषेधाचे काळे झेंडेही होतेच. अ‍ॅड. अणेंच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या कार्यक्रमात विदर्भ समर्थक पिवळ्या रंगाचे दुप्पटे गळ्यात अडक वून कार्यक्रमात सहभागी झाले होते. या पिवळ्या रंगात विदर्भध्वजाचे रंगच हरवून गेले होते.
एक मे हा कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. लालबावटा हे कामगारांचे प्रतीक. विविध कामगार संघटनांनीही या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात हा लालबावटा दिमाखाने फडकत होता. रविवारी कार्यक्रमांची, आंदोलनाची रेलचेल होती. मात्र, लोकांचा प्रतिसाद कशालाच नसल्याचे सार्वत्रिक चित्र होते. सकाळी विदर्भवाद्यांनी जेव्हा त्यांचा विदर्भध्वज फडकाविला तेव्हा मोजकीच मंडळी होती. शिवसेनेच्या आंदोलनात सैनिकच होते. तिच स्थिती मनसेच्या महाराष्ट्र दिनाची होती.

Story img Loader