नागपूर : राजकीय क्षेत्रात अनेक नेते असे असतात त्यांच्यामागे ‘व्हीआयपी’चा शिक्का असल्यामुळे अनेक ठिकाणी ते सामान्य माणसापेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र काही राजकीय नेते त्याला अपवाद असतात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठेही ‘व्हीआयपी’ कल्चरचा फायदा न घेता नागपूर विमानतळावर त्यांच्या साधेपणाचे आगळेवेगळे उदाहरण गुरुवारी सकाळी बघायला मिळाले.

हेही वाचा >>> “एखाद्या लग्नात गेलं तरी खोकेवाला….”, बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत

खरे तर साधेपणातच जीवनाची स्वाभाविकता आहे. साधेपणा हे एक मूल्य आहे. साधेपणामुळे मोठेपणाला बाधा येत नाही. मोठेपणाला झळाळी आणण्याचे काम साधेपणा करीत असतो. गेल्या आठ वर्षांत देशाच्या कार्यसंस्कृतीत आमूलाग्र बदल झाला आहे. ‘नो व्हीआयपी कल्चर’चा नारा देत भेदभाव मिटवून टाकण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्याचा वस्तुपाठ नागपूर विमानतळावर घालून दिला.

बुधवारी फडणवीस सकाळी नागपूरला आल्यानंतर गुरुवारी सकाळी दिल्लीला रवाना होण्यासाठी सकाळी नागपूर विमानतळावर आले. बोर्डींग पास काढण्यासाठी ते कुणालाही सांगू शकले असते किंवा थेट आत गेले असते. मात्र, स्वत:च बोर्डिंग पास काढण्यासाठी ते सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहिले आणि पास घेऊन ते आत गेले. फडणवीस यांचा साधेपणा पाहून नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत.