अकोला : भाजपने उमेदवार जाहीर केलेल्या सर्वच मतदारसंघातील तयारीचा परिपूर्ण आढावा घेऊन उमेदवारांच्या अडचणी समजून त्या दूर करण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघात एकदा निर्णय झाल्यानंतर महायुतीचा उमेदवार म्हणून सर्वांना काम करावे लागेल. काही नाराजी असेल तर ती आम्ही चर्चा करून दूर करीत आहोत. महायुती म्हणून सर्व घटक पक्ष कार्यरत राहतील, असा विश्वास भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. अमरावतीची जागा भाजपच लढणार असून जो उमेदवार असेल तो कमळावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे म्हणतात,‘भाजपचे स्वातंत्र्यलढ्यात योगदानच काय?, गोमांस निर्यात करणाऱ्याकडूनही निवडणूक रोखे…’

अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भाजपच्यावतीने जाहीर झालेल्या उमेदवारांच्या मतदारसंघात एकूण निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मी दौरा करीत आहे. सर्वच मतदारसंघामध्ये आम्ही जाणार आहोत. आता लगेच जाहीर प्रचार सुरू होत नाही. तो सुरू होण्यापूर्वी एकदा नीट व्यवस्था लावून नियोजन केले जात आहे. काही अडचणी असतील तर त्या समजून दूर केल्या जातील. अकोल्यात चांगली तयारी असून बुथपर्यंत सगळी रचना लावली आहे. पक्षाने ही निवडणूक बुथमध्ये लढली पाहिजे, असा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चांगला निर्णय येईल.’

हेही वाचा >>> महायुतीच्या उमेदवारीचे कोडे अधिकच गडद! -खा. भावना गवळी मुंबईत तर पालकमंत्री संजय राठोड यवतमाळात परतले

अमरावतीची जागा भाजप लढेल. जो उमेदवार असेल तो पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत. त्या पूर्ण पाच वर्ष भाजपसोबत राहिल्या आहेत. लोकसभेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपची बाजू मांडली. मात्र, अंतिम निर्णय पक्षाची संसदीय मंडळ व निवडणूक समिती घेईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांचे काही प्रश्न होते. ते प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असून काही सोडवले देखील आहेत. ते भाजपमध्ये आल्यापासून पक्षाप्रति समर्पित भावनेने कार्यरत आहे. पूर्णक्षमतेने ते पक्षाचे काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘माझी तर काही प्रतिमा ठेवा’

खा. संजय राऊत यांनी एका सभेत नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केल्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. ‘संजय राऊत कोण आहे? संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला विचारता, माझी तर काही प्रतिमा ठेवा’, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.