नागपूर : कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कायम नोकरीची संधी मिळावी म्हणून वयात सवलतीचे आश्वासन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला दिले होते. परंतु, कारवाई झाली नसल्याने हे कर्मचारी महावितरणमधील विद्युत सहाय्यक पदाचे अर्ज भरण्यास मुकले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने संताप व्यक्त केला आहे.
महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही सरकारी वीज कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांना १५ ते २० वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासह इतरही वीज कामगार संघटनांनी या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने केली. त्यावर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जानेवारी २३ पासून अनेकदा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासह इतर वीज कामगार संघटनांना नवीन भरतीत या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे मान्य केले.
हेही वाचा…‘हॅलो… मी उमेदवार बोलतो…’ अनपेक्षित दूरध्वनीमुळे मतदार त्रस्त
त्याबाबत ऊर्जा खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या गेल्या. परंतु, अद्यापही या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान, महावितरणकडून ५ हजार ३०० विद्युत सहाय्यकाची पदे भरण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२३ पासून सुरू आहे. त्यातच कंत्राटी कामगारांना वयोमर्यादेत सवलतीच्या घोषणेनंतर अर्ज भरण्याची मुदत वाढवून १९ एप्रिल करण्यात आली. ही मुदत शुक्रवार, १९ रोजी संपणार आहे. त्यामुळे सगळे कंत्राटी वीज कामगार या पदांचे अर्ज भरण्याला मुकणार आहेत. त्यामुळे तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेकडून आंदोलनाचा इशारा शासनाला देण्यात आला आहे.
हेही वाचा…महायुती विरुद्ध आघाडी लढत; पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जानेवारी २०२३ आणि ९ मार्च २०२४ रोजी कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना स्थायी पदावर घेता यावे म्हणून वयात सवलती घोषणा केली. परंतु, अंमलबजावणी नसल्याने ही घोषणा ‘जुमला’ ठरत आहे. याबाबत तातडीने बैठकी घेऊन हा प्रश्न मिटवावा. – नीलेश खरात, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ