नागपूर : राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे आठवड्याभरात राज्यातील विजेच्या मागणीत ५ हजार मेगावाॅटची घट झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी २९ ते ३० हजार मेगावाॅटपर्यंत वर गेली होती, हे विशेष.
राज्यात मागील आठवड्यात विजेची मागणी २८ ते २९ हजार मेगावाॅटच्या जवळपास होती. त्यात महावितरणच्या २५ हजार मेगावाॅट, तर मुंबईच्या ४ हजार मेगावाॅटपर्यंतच्या विजेच्या मागणीचा समावेश होता. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणने बऱ्याचदा कधी खुल्या बाजारातून महागडी वीज तर कधी दुपारी कमी दरात सौर ऊर्जा उपलब्ध झाल्यावर ती मिळवून ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा केला. परंतु आता पाऊस सक्रिय झाल्याने वातानुकूलित यंत्र, कुलर, कृषीपंपासह इतरही विद्युत उपकरणांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे सोमवारी (१० जून) दुपारी २.१० वाजता राज्याची मागणी केवळ २३ हजार २६४ मेगावाॅट नोंदवली गेली. त्यात महावितरणच्या १९ हजार ८४० मेगावाॅट तर मुंबईच्या ३ हजार ४२५ मेगावाॅट मागणीचा समावेश होता. त्यामुळे राज्यातील विजेच्या मागणीत सुमारे ५ हजार मेगावाॅट तर महावितरणच्या विजेच्या मागणीत सुमारे तीन ते साडेतीन हजार मेगावाॅटची घट झाल्याचे समोर आले.
विजेची उपलब्धता
राज्यात १० जूनला दुपारी २.१० वाजता सर्वाधिक ५ हजार ५५० मेगावाॅट वीज महानिर्मितीकडून उपलब्ध होत होती. त्यापैकी ४ हजार ७८९ मेगावाॅट औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून, २७६ मेगावाॅट उरण गॅस प्रकल्पातून, ४२५ मेगावाॅट जलविद्युत प्रकल्पातून, ५१ मेगावाॅट सौर उर्जेतून उपलब्ध होत होती. खासगी प्रकल्पांपैकी अदानीकडून १ हजार ८२० मेगावाॅट, जिंदलकडून ९६३ मेगावाॅट, आयडियलकडून १९१ मेगावाॅट, रतन इंडियाकडून १ हजार १५५ मेगावाॅट, एसडब्ल्यूपीएलकडून ३४५ मेगावाॅट वीज उपलब्ध झाली. केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला ८ हजार ८३२ मेगावाॅट वीज मिळाली.
एप्रिल महिन्यात सर्वोच्च मागणीची नोंद
महावितरणकडून यंदाच्या उन्हाळ्यात १७ एप्रिल २०२४ रोजी सर्वाधिक २५ हजार ६८ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली गेली. तर २७ फेब्रुवारीला २५ हजार २३ मेगावाॅट, २७ मार्चला २५ हजार ३५ मेगावाॅट, १९ एप्रिलला २४ हजार ८०५ मेगावाॅट, २२ मे रोजी २४ हजार ६०४ मेगावाॅट, ३ जूनला २४ हजार ४४३ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली गेली. परंतु मागील काही दिवसांत ही मागणी कमी झाली आहे.
हेही वाचा – नातवाचा खून, आजोबांचा गळफास; उमरखेड तालुक्यातील घटनेच्या तपासाचे पोलिसांपुढे आव्हान
“राज्यातील काही भागात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे विद्युत उपकरणांसह कृषीपंपाचा वापर कमी झाल्याने विजेची मागणी घटली आहे.” – भारत पवार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई.