नागपूर : महाराष्ट्रातील विविध उद्योग हे गुजरातला पळवले जातात असा आरोप विरोधकांकडून अनेकदा केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे असल्यामुळे उद्योगांसाठी गुजरातला प्राधान्य दिले जाते अशीही टीका होत आहे. परंतु, आता उद्योगानंतर चक्क महाराष्ट्रातील परीक्षेचे केंद्रच गुजरातला पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. या परीक्षेचे केंद्रही गुजरातच्या एका कंपनीला देण्यात आले आहे. यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. राज्याच्या गृहविभागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये पदभरती करण्यासाठी ५ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. गुजरातच्या एजन्सीमार्फत ही परीक्षा होत असून, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रासाठी जरी पदभरती असली तरी परीक्षेचे केंद्र मात्र गुजरातमध्ये आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये १७ डिसेंबर २०२४च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत वैज्ञानिक सहायक ही पदे फॉरेन्सिक ॲप्टीट्युड अँड कॅलिबर टेस्ट (एफएसीटी) जात आहेत. तर सहायक रासायनिक विश्लेषकांची १६६ पदे रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी गुजरातमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीला कंत्राट दिले आहे. त्यानुसार उमेदवारांची निवड करण्यासाठी ५ व ७ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
या परीक्षेसाठी गुजरातमधील राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गांधीनगर हे एकमेव परीक्षा केंद्र आहे. महाराष्ट्रातील फॉरेन्सिक लॅबसाठी ही पद भरती होत आहे. तेव्हा साहजिकच महाराष्ट्रातून अनेक उमेदवार परीक्षेसाठी पात्र असतील. मात्र महाराष्ट्रात परीक्षेसाठी एकही केंद्र नाही. गुजरात येथे जाण्यासाठी थेट रेल्वेची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहू शकतात, अशी भिती आहे.
विद्यार्थ्यांची मागणी काय?
फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली असून, ही भरती राज्यातील फॉरेन्सिक लॅबसाठी केली जात असून, यासाठी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु या परीक्षेसाठी महाराष्ट्रात एकही परीक्षा केंद्र नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. तेव्हा महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.