सोलापूर विभागात रेल्वे लाईन आणि यार्ड रिमॉडेलिंगच्या दुरुस्तीच्या कामामुळे, २१ ते २३ मार्चदरम्यान गोंदिया ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. सोलापूर विभागातील मनमाड, दौंड विभाग, बेलापूर, चितळी, पुणतांबा येथे २२ ते २३ मार्च रोजी दुहेरी लाईन यार्डच्या रीमॉडेलिंग कामामुळे मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> नागपूर : मतदार यादी आता आडनावाप्रमाणे ; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे नागपुरात संकेत
२१ आणि २२ मार्च रोजी कोल्हापूरहून सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस (११०३९) रद्द करण्यात आली आहे. तसेच गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस (११०४०) २२ आणि २३ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच गोंदिया मार्गावर धावणारी पुणे-हटिया एक्स्प्रेस (२२८४५) आणि पुणे-हावडा एक्स्प्रेस (१२१२९) सिकंदराबाद-बल्लारशाह-नागपूर मार्गावर २२ मार्च रोजी धावणार नाही. हावडा येथून सुटणारी हावडा -पुणे एक्स्प्रेस (१२१३०) २० आणि २१ मार्च रोजी नागपूर – बल्लारशाह -सिकंदराबाद- वाडी-दौंड मार्गावर धावेल. त्यामुळे गोंदिया – नागपूर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.