वर्धा: राज्यात नवे सरकार ५ डिसेंबर रोजी अस्तित्वात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधी सोहळा हा मुंबईच्या आझाद मैदानावर होणार हे स्पष्ट केले. अभूतपूर्व असे बहुमत महायुतीस मिळाले. त्यामुळे भाजप गोटात आनंदास उधाण आल्याचे दिसून येत आहे. पक्षाचा मुख्यमंत्री व अन्य मंत्री यांचा शपथविधी सोहळा दिमाखदारच राहणार म्हणून युती समर्थक या सोहळ्यासाठी उत्सुक आहेत. पण सोहळ्याचे निमंत्रण ठराविक समर्थकांनाच मिळणार. तसे प्रदेश पातळीवरून सूचित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील चार आमदार, माजी खासदार व आमदार, जिल्हा परिषद व नगर परिषदेचे माजी सदस्य, जिल्ह्यातून प्रदेश कार्यकारिणीवर असलेले सदस्य, ठराविक जिल्हा पदाधिकारी प्रामुख्याने निमंत्रित आहेत. आज दुपारी ही यादी निश्चित होणार आहे. ती प्रदेश कार्यालयास पासेस व अन्य सोपस्कार पूर्ण करण्यासाठी पाठवायची असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट म्हणाले. जिल्ह्यास मंत्रीपद मिळावे, असा आग्रह देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांना मुंबईत भेटून करून आल्याचे गफाट यांनी सांगितले.
हेही वाचा : वीज केंद्रामुळे प्रदुषण, चंद्रपूरमध्ये नोव्हेंबरचे सर्व ३० दिवस प्रदूषित
समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, सुमित वानखेडे, राजेश बकाने यापैकी कोणासही मंत्रीपद दिल्यास आनंदच होईल, असेही सांगण्यात आले. जिल्ह्यास मंत्रीपद नं लाभण्यास मोठा काळ उलटला असल्याने यावेळी तरी जिल्ह्यातून कोणी मंत्री होईल, अशी अपेक्षा भाजपजन बाळगून आहेत. जिल्ह्यातील चारही आमदार एकाच पक्षाचे निवडून येण्याची ही काही तपानंतरची पहिलीच वेळ आहे. यापैकी आमदार भोयर व कुणावार यांनी विजयाची हॅटट्रिक गाठली आहे. त्यामुळे या दोघांच्या गोटात मंत्रीपद मिळण्याची आशा उंचावली आहे. आमदार सुमित वानखेडे हे देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू समजल्या जातात. म्हणून त्यांच्या नावाची चर्चा असतांनाच ते जवळचे म्हणून त्यांना मंत्रिपदाची गरजच काय, असा गमतीदार प्रश्नही भाजप नेते करतात.
हेही वाचा : ‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानाचे गणित बदलले
जिल्ह्यात मंत्रीपद आल्यास पालकमंत्री पण जिल्ह्यातीलच राहणार. त्यामुळे स्थानिक प्रश्न लवकर सुटतील, अशी चर्चा सूरू झाली आहे. यापूर्वी शंकरराव सोनवणे,डॉ. शरद काळे, प्रभा राव, प्रमोद शेंडे, रणजित कांबळे,अशोक शिंदे यांनी मंत्रीपद भूषविलेले आहे. भाजपतर्फे मात्र जिल्ह्यातून कोणीही आजवर मंत्री झालेले नाही. म्हणून यावेळी मंत्रीपद मिळेलच, अशी भाजप नेत्यांना खात्री वाटते. हे ५ डिसेंबरच्या शपथविधी सोहळ्यात पाहायला मिळेल, अशी आस ठेवून किमान १०० भाजप पदाधिकारी ४ तारखेस रवाना होणार आहे.