नागपूर : वाहतूक पोलीस विभागाने दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या सहप्रवाशाला हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे. पोलिसांच्या या निर्णयाला शहरभरातून विरोध होत असून महिला संतप्त झाल्या आहेत. जर दोन मुलांना शाळेत सोडून द्यायचे असेल तर तीन हेल्मेट हाताळायचे कसे?, लहान मुलांच्या पाठीवर दप्तर आणि डोक्यावर हेल्मेट घालायचे का, असा संतप्त सवाल महिला पालकांनी उपस्थित केला आहे. वाहतूक पोलिसांनी दुचाकीवरील सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती केली आहे. हा निर्णय महिलांसाठी सर्वाधिक अडचणीचा ठरत आहे.
वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या या निर्णयाला शहरात विरोध वाढत आहे. दुचाकी चालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच महिलांनीही वाहतूक पोलिसांवर आपला रोष व्यक्त केला आहे. दोन हेल्मेट सोबत बाळगणे कठीण असल्याची प्रतिक्रिया शहरातील नोकरदार महिला, व्यावसायिक महिलांसह गृहिणींनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : राज्यात आता दुचाकी चालकाप्रमाणेच सहप्रवाशासही हेल्मेटसक्ती…अंमलबजावणी कधीपासून? निर्णयामागे कारण काय?
अतिरिक्त हेल्मेट बाळगणे कठीण
दुचाकीने शाळेत जाताना अनेकदा पायी जाणाऱ्या विद्यार्थिनीलाही शाळेपर्यंत सोडून देते. तसेच रस्त्यावर भेटलेल्या शिक्षिकांनाही सोबत घेते. मात्र, आता दुचाकी घेऊन शाळेत निघताना कुणाची मदत करता येणार नाही. कारण, रोज अतिरिक्त हेल्मेट बाळगणे शक्य नाही.
स्वाती गांजरे, मुख्याध्यापिका
बाजाराची पिशवी कुठे ठेवणार?
शेजारच्या महिलेसोबत दुचाकीने बाजाराची पिशवी आणायची असेल तर दुचाकीच्या समोर तशी व्यवस्था असते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या नव्या नियमामुळे आता ती जागा दोन हेल्मेटला द्यावी लागेल. मग, बाजाराची पिशवी कुठे ठेवणार? त्यामुळे सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती नकोच.
करुणा तऱ्हेकर, गृहिणी
वसुलीचा नवा मार्ग खुला
दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेटसक्ती केल्यामुळे वाहतूक पोलिसांसाठी पैसे वसुलीचा नवा मार्ग खुला झाला आहे. दुचाकीचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये दंड वसूल करण्यावरून रोज वाद उद्भवतील. तसेच शे-पाचशे रुपये घेतल्यानंतरच वाहतूक पोलीस वाहन सोडतील. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या निर्णयावर फेरविचार करावा.
कोमल जांगळे, विद्यार्थिनी.
हेही वाचा : हेल्मेटसक्तीचा आता नवा नियम… कशी आणि कोणावर होणार कारवाई?
बाजारात हेल्मेटचा तुटवडा
सहप्रवाशांना हेल्मेटसक्ती केल्यास प्रत्येक कुटुंबाला दोन हेल्मेट ताबडतोब विकत घ्यावे लागतील. लहान मुलांना वेगळे हेल्मेट लागतील. नव्या नियमामुळे आता हेल्मेटची खरेदी अचानक वाढली आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात हेल्मेटचा तुटवडा आहे. या सर्व समस्या लक्षात न घेता वाहतूक पोलीस मनमानी करीत आहेत.
वर्षा देशमुख, व्यावसायिक.
कारवाईऐवजी जनजागृती करा
वाहतूक पोलिसांनी कारवाईवर भर देण्याऐवजी जनजागृतीवर भर द्यावा. शहरातील खड्डे आणि नादुरुस्त वाहतूक सिग्नलकडे लक्ष द्यावे. चौकाचौकात, वस्त्यांमध्ये आणि शाळांमध्ये जाऊन हेल्मेटबाबत जनजागृती करावी. त्यानंतर सहप्रवाशाला स्वच्छेने हेल्मेट घालण्यासाठी प्रोत्साहित करावे.
दीपाली आमदरे, खेळाडू.