नागपूर : धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीतून भारतीय समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतीची ज्योत पेटवणारे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य घराघरांत पोहोचावे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली ‘चरित्र साधने प्रकाशन समिती’ थंड्या बस्त्यात पडली आहे. अनेक वर्षांत समितीची बैठकच झाली नसून तीन वर्षांत एकही नवा ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला नाही.
‘महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती’ची स्थापन १९९१मध्ये करण्यात आली. त्यानंतर २०२१मध्ये समितीचे पुनर्गठन करण्यात आले. त्यात रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, रंगनाथ पठारे, प्रा. आनंद उबाळे, प्रा. प्रमोद मुनघाटे अशा दिग्गजांचा समावेश आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री समितीचे अध्यक्ष तर विभागाचे संचालक निमंत्रक आहेत. समितीला मे २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तीन वर्षांत एकही पुस्तक प्रकाशित केले गेलेले नाही. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी १ ऑक्टोबर २०२४ मध्ये महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीची ऑनलाईन बैठक घेतली होती. यावेळी इतर बहुजन कल्याण विभागाकडून समग्र ग्रंथाचे पुनर्मुद्रण करण्याची मागणी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी केली होती. या मागणीला मान्यता देण्यात आली होती. परंतु, तो ग्रंथही अद्याप वाचकांच्या हाती आलेला नाही.
गेल्या तीन वर्षांत एकही नवा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला नसून ‘चरित्र साधने प्रकाशन समिती’ची बैठकही गेल्या अनेक वर्षांत झाली नसल्याचे समोर आले आहे.