भंडारा : राष्ट्रीय सुरक्षितता आणि वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. याकरिता शासनाने एक बुकींग पोर्टल सुरू केले आहे. मात्र यातही आता सायबर गुन्हेगारांनी घुसखोरी केली असून अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. गुगल शोधमध्ये पहिल्याच क्रमांकावर दिसणाऱ्या संकेत स्थळाद्वारे वाहन मालकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी येत असून जिल्ह्यातील काही जणांच्या खात्यातून पैसे गेले आहेत. त्यामुळे एचएसआरपी बुकींग करताना शासनाचे अधिकृत पोर्टल आहे की बनावट याबाबत खात्री करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या अधिनियम ५० अन्यये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात एचएसआरपी बसविण्याची तरतुद करण्यात आली आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसर एचएसआरपी बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र यातही आता आर्थिक लूट आणि फसवणूक सुरू झाली आहे. १ एप्रिल २०१९ च्या आधीच्या गाड्यांना एच.एस.आर.पी साठी http://maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे. मात्र ऑनलाईन बुकींग करण्यासाठी संकेत स्थळावर जी पहिली लिंक येते ती एच.एस.आर.पी बुकिंग सेवांसाठी गुगल शोधमध्ये पॉप अप झाली आहे.

भंडारा बी. एड. कॉलेजच्या प्राध्यापिका मुंडासे यांनी सांगितले की, “माझ्या पतीच्या नावावर असलेल्या दुचाकी वाहनावर नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी मी एच.एस.आर.पी बुकिंगच्या पहिल्या संकेत स्थळावर क्लिक केले. मला वाटले हे संकेत स्थळ सरकारने मंजूर केलेले आहे. अर्जामध्ये वैयक्तिक तपशील भरल्यानंतर क्युआर कोड आला. तो स्कॅन करून बुकिंगसाठी मी एक हजार रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले मात्र त्यानंतर बुकिंग संदर्भात वेबसाईटवरून कोणताही प्रतिसाद मिळाला. मी केलेले ऑनलाईन पेमेंट रोहन गुप्ताच्या नावाने गेल्याचे मला कळले. त्यामुळे माझी फसवणूक झाल्याचे मला लक्षात आले. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर चुकून व्यवहार झाल्यास रद्द करता येतात तसे येथे करता येत नाहीत. गुगल वर हे पहिलेच संकेतस्थळ असल्याने अनेक जण याच लिंकवर क्लिक करतात आणि आर्थिक फसवणुकीला बळी पडतात. विशेष म्हणजे यासंदर्भात तक्रार करण्यासाठी मी उप प्रादेशिक परिवहन विभागात गेली असता हा आमचा विषय नसल्याचे सांगून तेथील अधिकाऱ्यांनी हात वर केले, त्यामुळे तक्रार कुठे करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे”.

याबाबत भंडारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्मा यांना विचारणा केली असता त्यांनी सुरवातीला हा शासनाचा विषय असून यात आपण काही करू शकत नाही असे सांगितले. नंतर त्यांनी या महिलेला सोमवारी पाठवा त्यांची तक्रार घेण्याचे आश्वासन दिले. यावरून उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाच या विषयाचे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, यासाठी भंडारा जिल्ह्याकरिता एमए एफटीए एच.एस.आर.पी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसविण्याकरिता  http://maharashtrahsrp.com हे बुकिंग पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे. वाहनधारक भंडारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त भंडारा जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास एच.एस.आर.पी नंबर प्लेट वसविणे आवश्यक आहे. एच.एस.आर.पी  नंबर प्लेट बसविण्या संदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठा चालकांच्या पोर्टलवर तसेच भंडारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करू शकतात.

एच.एस.आर.पी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे / उत्तरविणे / दुय्यम प्रत/ विमा अद्ययावत करणे इ. कामकाज थांबविण्यात येतील तसेच एच.एस.आर.पी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आला आहे.

सदर एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसविण्याकरीता पुढील प्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे.

दुचाकी/ट्रॅक्टर  – ४५०/-

तीन चाकी  – ५००/-

इतर सर्व वाहने  – ७४५/-