भाजप इच्छुकांमध्ये अस्वस्थता
प्रदीर्घ काळानंतर पक्ष सत्तेत आल्यानंतर त्याची फळे चाखण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना नियुक्तयांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात एकमत होत नसल्याने महामंडळांवरील नियुक्तया लांबल्या आहेत. सत्ता येऊन वर्ष होत आले तरी सत्तेच्या पदापासून दूर असल्याने भाजपमध्ये इच्छुकांच्या संयमाचा बांध आता फुटण्याच्या मार्गावर आहे.
गडकरी आणि फडणवीस या दोन नेत्यांमध्ये भाजपमधील इच्छुकांची विभागणी झाली असून, कोणाची नियुक्ती करायची, यावर एकमत होताना दिसत नाही. त्यातच घटक पक्षांनीही महत्त्वाच्या समित्यांवर दावे केल्याने पेच अधिकच वाढला आहे. भाजपच्या शहर शाखेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांतच महामंडळांवरील नियुक्तया जाहीर केल्या जातील, असे जाहीर करतानाच पूर्व नागपूरचे आमदार व पक्षाचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांना ‘तयार राहा’ असे सांगितले होते. या घोषणेलाही आता दोन महिने होत आले. खोपडे समर्थकही आता वाट पाहून थकले आणि खासगीत ते नाराजीही व्यक्त करू लागले आहेत. उपद्रवमूल्य दाखविण्याची धमकी देणाऱ्यांची तातडीने वर्णी लावणारे मुख्यमंत्री संयमाने काम करणाऱ्यांना वाऱ्यावर का सोडतात, असा सवाल आता पक्षातूनच विचारला जात आहे.
भाजपचे शहरात ६ आणि ग्रामीणमध्ये ५ असे एकूण ११ आमदार आहेत. यापैकी खोपडेंना महामंडळ दिल्यास मध्य आणि दक्षिण नागपूरमधूनही मागणी पुढे रेटली जाण्याची शक्यता आहे. एका आमदाराला नागपूर सुधार प्रन्यासवर सामावून घेतले तरी प्रश्न सुटणार नाही, हे पक्ष नेतृत्त्वाला माहिती आहे. त्याचप्रमाणे शिवसेना, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात सत्तेत वाटा मागितला आहे. त्यामुळे एकीकडे पक्षातील इच्छुकांना सांभाळतानाच दुसरीकडे मित्रपक्षाला सांभाळून घेण्याची कसरत भाजपला करावी लागत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातही त्यांच्या समर्थकांची वर्णी लावण्याबाबत एकमत न होणे हे सुद्धा विलंबाचे प्रमुख कारण आहे.
असंतोष वाढणार
महापालिका निवडणुकीवर डोळे ठेवून भाजपने शहरात मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी नियुक्तयांच्या प्रतीक्षेत असलेले नेते अजूनही त्यात मनाने सहभागी होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पक्षाचा महाजनसंपर्क फक्त कागदोपत्रीच उरला आहे. नियुक्तया जितक्या काळ लांबतील तितका पक्षात असंतोष अधिक वाढणार असून त्याचा फटकाही पक्षाला बसण्याची शक्यता भाजपमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
महामंडळांवरील नियुक्तीचा तिढा सुटता सुटेना
घटक पक्षांनीही महत्त्वाच्या समित्यांवर दावे केल्याने पेच अधिकच वाढला आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 04-09-2015 at 03:55 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government making delayed over board appointments