नागपूर : केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेतून येत्या दोन वर्षांत ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला दरडोई ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. राज्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. त्यात जल जीवन मिशन कार्यक्रमासाठी ३७ हजार २२७ कोटी रुपयांच्या कृती आराखडय़ास मंजुरी देण्यात आली.
केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन ही योजना राबवली जाते. त्यात ५० टक्के खर्च केंद्राचा व ५० टक्के राज्य सरकार करते. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे या योजनेचे तउद्दिष्ट आहे. योजनेतून आतापर्यंत राज्यात १ कोटी ४१ लाख ६,८६८ कुटुंबांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित लोकांना जोडण्या देण्यासंदर्भात वरील बैठकीत नियोजन करण्यात आले. त्यानुसार २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३७ हजार २२७ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला.
राज्यात ३७ हजार ९९३ नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. तसेच २०२२-२३ या वर्षांत २७ लाख ३६ हजार ७७५ कुटुंबांना नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित १५ लाख १९,१७९ कुटुंबांना २०२३-२४ मध्ये नळजोडण्या देण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यात या योजनेची १०० टक्के अंमलबजावणी झाली आहे. तर उपराजधानी नागपूरमध्ये आतापर्यंत ९१.२३ टक्के कामे पूर्ण केली आहेत.
विदर्भात पाणीपुरवठय़ाची झालेली कामे (टक्क्यांत)
नागपूर ९१.२३
वर्धा ८५.८०
बुलढाणा ७९.९८
अमरावती ७७.९
पुणे ७७.७९
अकोला ६७.४३
वाशीम ६६.४८
भंडारा ६४.४१
गडचिरोली ६१.०७
गोंदिया ६१.५९
यवतमाळ ६१.५३
गोंदिया ६१.५३
चंद्रपूर ५१