नागपूर : महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनी देखील राज्याच्या माजी गृहमंत्र्यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याबाबत सुतोवाच करीत बंदी येण्याआधी प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे, असे नमूद केले.
सूत्राच्या माहितीनुसार राज्य सरकार “द डायरी ऑफ अ होम मिनिस्टर” या पुस्तकावर बंदी घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा डाव कसा आखला गेला, कसे कटकारस्थान शिजले, पोलीस दलातील अधिकाऱ्यांना प्यादे बनवून कशी चाल रचण्यात आली या गोष्टींची धक्कादायक माहिती या पुस्तकातून समोर आली आहे. ही खळबळजनक माहिती महाराष्ट्राच्या पुढे येऊ नये, म्हणून सरकारने ही खेळी खेळली आहे, असे जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ हे पुस्तक लिहले आहे. यात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीसांवर आरोप काय?
“तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून खोटे आरोप आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेंवर करण्यास मला सांगण्यात आले. मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली”, असं अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
“तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिलं. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यातल्या चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र करून देण्यास मला सांगण्यात आलं होतं. ते जर मी करून दिलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार हे अडचणीत आले असते” असंही अनिल देशमुख लिहले आहे.
आदित्य ठाकरे, दिशा सलियान प्रकरण
अनिल देशमुख यांनी त्यांचं ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’, असं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आदित्य ठाकरे, पार्थ पवार, ईडी, दिशा सलियान प्रकरण, आपल्या कुटुंबाला कसा त्रास देण्यात आला? कोणी आणि कसे षडयंत्र रचले?, याबाबत त्यांनी पुस्तकात खुलासे केले आहेत.
पवारांबाबतही धक्कादायक खुलासा
“अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं काय होणार होतं? भाजपाला त्यांना कसं अडकवायच होतं? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध कोणता कपटी डाव रचला गेला?”, यासंदर्भात अनिल देशमुख यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
© The Indian Express (P) Ltd