नागपूर: राज्यात शंभर दिवस कृती आराखडा निर्धारित केला आहे. आता पर्यंत ४११ कामांची कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर ३७२ कामे लवकरच पूर्ण होणार आहे. एक मे पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत तसेच प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावर शंभर दिवस कार्यक्रमाची माहिती उपलब्ध केले जाणार आहे.
महायुतीचे सरकार सत्तारूढ झाल्यावर पहिल्या शंभर दिवसात कोणती कामे प्राधान्याने करायची यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. त्याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. अनेक विभागांनी यामध्ये उत्तम काम केले असून जनतेला या माध्यमातून उपयुक्त आणि तत्पर सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शंभर दिवस कार्यक्रमाचा कालावधी १५ दिवस वाढविण्यात आला आहे . येत्या एक मे रोजी सर्व विभागांनी आपल्या संकेतस्थळावर विभागाने काय ठरवले होते तसेच किती कामे पूर्ण केलीत याची माहिती द्यावी. त्यासोबतच जर काही कार्यवाही अपूर्ण राहिली तर त्याची कारणे ही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.तसेच यापुढे ही विभागांनी गतीमानतेने लोकोपयोगी कामे गुणवत्तेसह आणि कालमर्यादेत पूर्ण करावयाची आहे.
लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर कार्यवाही तत्परतेने करण्यासाठी विभागांनी आपल्यास्तरावर एक यंत्रणा कार्यान्वित करावी. उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी तांत्रिक, प्रशासकीय वा इतर अनुषंगीक बाबींची तातडीने पूर्तता करावी. विभागांनी उपलब्ध निधीचा सुयोग्य वापर करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना ही फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत एकून २६ विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागांचे ९३८ मुद्द्यांपैकी ४११ मुद्द्यांवर (४४℅) पूर्णतः काम झाले आहे. तसेच, ३७२ मुद्दे (४०%) अंतिम टप्प्यात असून निश्चित वेळेत पूर्ण होतील. मात्र, १५५ मुद्दे (१६%) अद्याप पूर्ण झाले नाहीत. या कामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या समस्यांची माहिती संबंधित विभागांनी दिली . त्यासाठी त्यांना १५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. सर्व विभागांनी कामे पूर्ण करुन एक मे ला त्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्री यांनी निर्दशित केले.