नागपूर : बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने शासनाने सहा तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या सर्वांची बदली नागपूर विभागात विविध ठिकाणी झाली होती. जून-जुलै महिन्यात महसूल संवर्गातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या बदल्या करण्यात आल्या. काही जण बदलीच्या ठिकाणी रुजू झाले. परंतु, काहींनी बदली रद्द करण्याच्या प्रयत्नात निर्धारित कालावधीत रुजू होणे टाळले.
हेही वाचा >>> “…अन्यथा तेली समाजाचा लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा इशारा
बदली आदेश निघाल्यावर दोन महिने झाले तरी रुजू न झालेल्यांचा अहवाल शासनाने संबंधित विभागाकडून मागवला. तो प्राप्त झाल्यावर सर्व संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कारवाईचे संकेत मिळताच काही तहसीलदार बदलीच्या ठिकाणी रुजू झाले. परंतु, काहींनी त्यानंतरही रुजू होणे टाळले. त्यामुळे शासनाने निलंबन कारवाईचा बडगा उगारला. त्यात वंदना भोसले, बालाजी सोमवंशी, विनायक थविल, सुरेंद्र दांडेकर, बी. गोरे, पल्लवी तभाने आदींचा समावेश आहे. वंदना भोसले यांची नागपूर येथे खरेदी अधिकारी पदावर, सोमवंशी यांची बेला (ता. उमरेड) येथे अतिरिक्त तहसीलदार पदावर बदली झाली होती. तर इतरांची नागपूर विभागातील इतर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.