नागपूर : राज्याच्या वनखात्याचे वनबलप्रमुख वाय.एल.पी. राव हे ऑगस्टअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. या पदासाठी दोन दावेदार असून त्यातील कोणाच्या डोक्यावर हा मुकुट चढणार याचा निर्णय गुरुवारी आयोजित बैठकीत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनबलप्रमुख पदासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) शैलेश टेंभूर्णीकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर १९८७च्या बॅचच्या भारतीय वनसेवेतील अधिकारी सुनीता सिंह या देखील या पदासाठी प्रयत्न करत आहेत. सामाजिक वनीकरण विभागात त्या कार्यरत असून २०१७ ते २०२१ या काळात नवी दिल्ली येथील ग्रामीण विद्युतीकरण महामंडळात प्रतिनियुक्तीवर होत्या.

हेही वाचा >>> वर्धा: काँग्रेसची ‘भारत जोडो’ नंतर आता ‘जनसंवाद’ यात्रा

राष्ट्रीय दक्षता आयोगाचे मुख्य दक्षता आयुक्त यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहाराबाबत प्रतिकूल शेरे व टिपप्णी करून त्यासंबंधी नोंदी अभिलेख्यात घेतल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाचे विशेष सचिव तथा भारताचे महानिर्देशक यांच्या कार्यालयात देखील या नोंदी उपलब्ध आहेत. मात्र, या कागदपत्रात फेरफार करून त्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) या सर्वोच्च पदावर पदोन्नतीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

त्यासाठी त्यांनी आमदार तसेच शासनातील सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्यांचा आधार घेतल्याची माहिती असून प्रशासन तसेच मुख्यमंत्री कार्यालयावर दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची सुद्धा चर्चा आहे.

हेही वाचा >>> वर्धा जिल्ह्यातून अपहरण झालेल्या दोन मुलींची गडचिरोली येथून सुटका करण्यात यश

दरम्यान, केंद्रीय दक्षता आयुक्तांनी सुनीता सिंह यांच्याविरुद्ध केलेल्या नोंदी व टिप्पणी दस्तऐवज राज्य शासनाने मागवून अभिलेख अद्ययावत करावे आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यास खात्यातील सर्वोच्च पद देऊ नये, अशी विनंती खात्यातीलच काही अधिकाऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे वनमंत्री यावर काय निर्णय घेतात व ते बैठकीत कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी अधिकाऱ्याला संधी? वनबलप्रमुख पदावर आतापर्यंत भारतीय वनसेवेतील उत्तर आणि दक्षिणेकडील अधिकाऱ्यांचाच वरचष्मा राहिला आहे. पहिल्यांदाच या पदासाठी मराठी अधिकारी प्रबळ दावेदार ठरत असल्याची चर्चा आहे. सुनीता सिंह यांच्यापेक्षा टेंभूर्णीकर वरिष्ठ असून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.