नागपूर: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा नागपूर दौरा असल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे नागपूरकडे येण्यास निघाले. साधारणत: अतिविशिष्ट व्यक्ती विमानाने किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करतात. परंतु राज्यपालांना वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याचा मोह आवरता आला नाही. पण, यामुळे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. वाचा नेमके काय घडले….
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विशेष उपस्थितीत शुक्रवारी नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव सोहळा आणि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही कार्यक्रमांसाठी राज्यपाल रमेश बैस यांना देखील नागपूर गाठायचे होते. ते त्यांच्या रायपूर (छत्तीसगड) मूळगावी होते. येथून ते नागपूरला बिलासपूर – नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसने आले. त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करण्याचा आनंद लुटला.
मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ८ येथे दुपारी १२.१५ वाजता त्यांचे आगमन झाले. राज्यपाल शहरात आल्यानंतर त्यांचे स्वागत राजशिष्टाचारानुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह इतर प्रमुख अधिकाऱ्यांना करावयाचे असते. शिवाय सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवावी लागते. रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या गाड्या काही काही मिनिटांच्या अंतराने ये-जा करीत असतात. त्यामुळे प्रवाशांचा कायम राबता असतो. अशावेळी सुरक्षा व्यवस्था आणि राजशिष्टाचार पार पाडताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.