आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

जगभरातील बौद्धधर्मियांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या नागपूर येथील दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला त्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.

नागपूर येथील दीक्षाभूमीला ऐतिहासिक महत्त्व असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला लक्षावधी अनुयायांच्या उपस्थितीत बौद्धधर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर गेली ६० वष्रे हे स्थळ केवळ देशातीलच नव्हे, तर जगभरातील बौद्धधर्मियांसाठी पवित्र मानले जाते. याठिकाणी उभारण्यात आलेला भव्य स्तूप पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरला आहे.

देशातील बौद्धगया या शहराव्यतिरिक्त केवळ दीक्षाभूमीवरच बोधीवृक्ष आहे. वर्षभरात सुमारे ११ लाख एवढय़ा मोठय़ा संख्येने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटक, भाविक आणि अभ्यासक याठिकाणी भेट देत असतात. त्यात सर्वसामान्य नागरिकांसोबतच विविध मान्यवरांचाही मोठय़ा प्रमाणावर समावेश असतो. याबाबत नागपूरचे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी शासनाकडे दीक्षाभूमीच्या विकासासाठी प्रस्ताव पाठविले होते.

यापूर्वी दीक्षाभूमीस ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्यात आला होता. मात्र, गेल्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षांनिमित्ताने दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर याबाबतच्या कार्यवाहीला वेग देण्यात आला. त्यानुसार पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यास मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली आहे.या निर्णयामुळे दीक्षाभूमीच्या भविष्यातील मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षांतच हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra govt approves grade a status to deekshabhoomi at nagpur