लोकसत्ता टीम
चंद्रपूर : आकाशातून वीज पडून मृत्यू मुखी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे देशात वीज पडून सर्वाधिक २७ टक्के मृत्यु महाराष्ट्रात होतात. एकूण मृत्यूपैकी ७१ % लोक झाडाखाली थांबल्यामुळे, ६६ टक्के मृत्यु पुरुषांचे तर ६८ टक्के मृत्यु आदिवासी समाजातील लोकांचे असल्याची धक्कादायक माहिती अभ्यासातून समोर आली आहे.
येथील जनता महाविद्यालयातील प्राध्यापक तथा भूगोल, वातावरण, वन्यजीव विषयाचे अभ्यासक डॉ योगेश दूधपचारे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आठ मृत्यू वीज पडून झाल्याची दु:खद बातमी वाचली त्यानंतर या अभ्यासाची माहिती दिली आहे. विज पडायची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, याचा हवामान बदला सोबत सरळ संबंध जोडला जातोय. हवामानाच्या एखाद्या गोष्टीवर नियंत्रण साधले जाऊ शकेल परंतु वीज पडण्यावर नियंत्रण अन्य अत्यंत कठीण काम आहे. वीज पडून मृत्यू मात्र गरिबांचाच जास्त होतोय. एका संशोधनातून मिळालेली आकडेवारी सांगते की ६६% मृत्यू हे पुरुषांचे आणि ३४% स्त्रियांचे आहेत. ६२% हे वयस्क लोकांचे आणि ३८% हे मुलांचे आहेत.
आणखी वाचा-यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार; अनेक मार्ग बंद, शाळांना सुट्टी
एकूण मृत्यूपैकी ७१ % लोक झाडाखाली थांबल्यामुळे मृत्युमुखी पावले, २५% लोकांच्या अंगावरच वीज पडली, ४% लोक धक्क्यामुळे मृत्युमुखी पडलेत. संपूर्ण देशात झालेल्या मृत्यू पैकी तब्बल २९ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातीलही एकूण आकडेवारीचा विचार केला तर सर्वात जास्त मृत्यू हे विदर्भात होत आहेत असे एक दुसरे संशोधन सांगते, आणि विदर्भातील ही एकूण आकडेवारी पैकी विजेपासून झालेले मृत्यू हे शिंदेवाही नागभीड आणि ब्रह्मपुरी च्या परिसरात पहावयास मिळतात. यावरून चंद्रपूर जिल्ह्याला असलेला धोका लक्षात येऊ शकतो.
एकूण मृत्युमुखी पडले त्यापैकी ६८% हे आदिवासी आणि ३२% हे गैर आदिवासी असतात. ९% खेडूत आणि साधारणता ४% नागरी लोक मृत्युमुखी पडतात. ७७% शेतकरी आणि २३% इतर लोक मृत्युमुखी पडतात. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की विजेपासून धोका हा गरिबांना श्रीमंतांच्या तुलनेत दुप्पट आहे. ज्या हवामान बदलामुळे विजांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असा निष्कर्ष निघतोय त्या हवामान बदलात गरिबांच्या वाटा शून्य आहे.
आणखी वाचा-विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याने दिले ऑरेंज, रेड अलर्ट
ओमवीर सिंग नावाच्या संशोधकाने १९७९ ते २०११ मध्ये वीजांनी मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी सादर केली आहे. या काळात महाराष्ट्रात १५१२ लोकांचा विज पडून मृत्यू झालाय, पश्चिम बंगाल ६५५ मृत्यू सोबत दुसऱ्या क्रमांकावर आणि उत्तर प्रदेश ४५५ मृत्यूसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चा महाराष्ट्र आणि दुसऱ्या क्रमांकावरचा पश्चिम बंगाल यात दुप्पटीपेक्षाही जास्त फरक आहे. संशोधकांच्या मते ४७.२ % मृत्यू हे मान्सूनच्या काळातील, ४१.५ % मृत्यू हे उन्हाळ्यातील आणि ७.७% मृत्यू हे पोस्ट मान्सून काळातील आहेत.
या आकडेवारीचा विचार जरी केला तरी असे स्पष्टपणे म्हणता येते की विजांपासूनच्या मृत्यूला फक्त अवेअरनेस कमी करू शकते. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट च्या वतीने केली जाणारी भविष्यवाणी मोठ्या प्रमाणात आम्ही दुर्लक्षित करतोय. पावसाळ्याची दिवसात झाडांच्या खाली थांबू नये हा साधा मंत्र आम्ही समजू शकलो नाही. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश मध्ये लोकांनी त्यांच्या घरावर सायकलच्या रिंग पासून बनवलेले वीज रोधक बरेच सफल झालेले आहेत असे दिसते, असा देशी जुगाड पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड या भागात लोकांनी केलेला दिसतो. यांच्याकडूनही शिकण्यासारखे बरेच काही आहे. एकूणच हवामान बदलाला आम्ही थांबवू शकलो, तर अशा एक्स्ट्रीम वेदर कंडीशन कमी होतील यात शंका नाही.