नागपूर: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने राज्यभरातील खासगी रुग्णालयांकडून नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हास्तरावर तपासणी पथके तयार केली आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबतही सूचना केल्या, परंतु अनेक रुग्णालये नियमांचे पालन करत नसल्याचे पुढे आले आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट एक्ट २०१० च्या धर्तीवर व महाराष्ट क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट एक्टमध्ये महत्त्वाच्या सुधारणा लागू करण्याबाबतचा योग्य तो निर्णय तात्काळ घेण्याचे निर्देशित केले होते. त्यानंतर मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत रुग्णहितार्थ खासगी रुग्णालये नियमांचे पालन करीत आहे किंवा कसे हे तपासण्यासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांची एक महिन्यात तपासणी करून कारवाई करण्याची सूचना केली होती.

दरम्यान खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी राज्यभरात जिल्हा स्तरावर पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. तपासणी करून आरोग्य सेवा आयुक्तांकडे दैनंदिन अहवाल सादर करण्यात येत आहे. आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून ५ जानेवारी २०२५ रोजीच्या पत्रान्वये राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका यांना ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या काळात त्यांच्या कार्यक्षेत्रात नोंदणी झालेल्या सर्व खासगी रुग्णालयांच्या तपासण्या नियमाप्रमाणे कोणत्याही रुग्णालयाला नाहक त्रास न देता पूर्ण करण्याबाबतचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते.

जबाबदारी कुणावर?

आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने या तपासणीची जबाबदारी प्रत्येक जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदांमधील जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी या स्थानिक पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्यावर सोपविली आहे.

किती रुग्णालयांत नियमांची पायामल्ली?

राज्यभरात खासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम राबविण्यात आली असून एकूण १९ हजार ३८८ शुश्रूषागृहांची तपासणी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आली. दरम्यान तपासणीत मापदंडानुसार पूर्तता करीत नसलेल्या २ हजार ९३६ शुश्रूषागृहांना १ महिन्याच्या आत त्याची पूर्तता करण्याबाबतच्या कळविण्यात आल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.

खासगी रुग्णालयांना धडकी?

तपासणी दरम्यान अधिकारी नाहक त्रास देत असल्याचे खासगी रुग्णालयांचे मालक नाव न टाकण्याच्या अटीवर सांगत आहेत. त्यामुळे या तपासणी मोहिमेची खासगी रुग्णालय संचालकांना धडकी भरल्याचे चित्र आहे.

Story img Loader