नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आज सोमवारी गृहमंत्रालयाने जाहीर केल्या. त्यात नागपुरात नव्याने ११ पोलीस अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळाली असून नागपुरातून ७ अधिकाऱ्यांच्या शहराबाहेर बदल्या झाल्या आहेत. गृहमंत्र्याचे शहरात आयुक्तालयाचा कारभार फक्त चारच पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर होता. त्यामुळे उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेला तडा गेला होता. त्यामुळे पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे होते. आज सोमवारी गृहमंत्रालयाकडून बदल्यांची यादी जाहीर झाली. नागपुरातील गुन्हे शाखा आणि सध्या परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांची मुंबईत फोर्स वन येथे पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांचा नागपुरातील कार्यकाळ आणि जनसंपर्क बघता सोमवारी रात्री उपायुक्त राजमाने यांच्या कार्यालयात अनेकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. यामध्ये अनेक पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांचाही समावेश होता. नागपुरातील उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांची नागपूर ग्रामीण पोलीस विभागात अतिरिक्त अधीक्षक पदावर बदली झाली.
ग्रामीणचे राहुल माकनीकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली. तत्कालीन अधीक्षक विजय मगर यांची पुणे शहरात बदली झाली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) राजलक्ष्मी शिवनकर यांची पुण्यातील लोहमार्ग विभागाच्या अधीक्षक पदावर बदली झाली. नागरी हक्क संरक्षण नागपूरचे अधीक्षक प्रशांत खैरे यांची अहमदनगर जिल्हा अतिरिक्त अधीक्षक पदावर तर नागपूर राज्य राखीव दलाचे समादेशक पंकज डहाणे यांची मुंबईत पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागेवर एसआरपीएफची जबाबदारी प्रियंका नारनवरे (पुणे) यांची बदली झाली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले विश्वा पानसरे यांची नागपूर गुन्हे अन्वेशन विभागाच्या अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच वर्ध्याचे अति, अधीक्षक यशवंत सोळंके यांची नागपूर महामार्ग सुरक्षा पथकाच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे. नागपुरात पोलीस उपायुक्त पदावर परभणीचे अति. अधीक्षक मुमक्का सुदर्शन, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे विश्वास पांढरे, एसीबी नाशिकचे अधीक्षक सुनील कडासने, मुंबईचे उपायुक्त धोंडोपंत स्वामी, लातूरचे अति. अधीक्षक अनुराग जैन, वाशिमचे अति. अधीक्षक गोरख भामरे, खामगावचे अति. अधीक्षक श्रवण दत्त, ठाणे शहरातील आर्थिक गुन्हे शाखेचे सुनील लोखंडे यांची नियुक्ती झाली आहे.