गडचिरोली : उत्तरे लिहिलेली प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांना दिल्याचा धक्कादायक प्रकार मुलचेरा येथील शहीद बाबूराव शेडमाके विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर उघडकीस आला आहे. हिंदी विषयाच्या पेपरला शिक्षणाधिकारी (मा.) वासुदेव भुसे यांच्या भरारी पथकाने दिलेल्या भेटीत हा प्रकार समोर आला आहे. यानंतर शिक्षण मंडळाच्या सुचनेनुसार केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकाला निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेला दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्या

बारावी परीक्षा सुरु आहेत. १२ फेब्रुवारी रोजी हिंदी विषयाचा पेपर झाला. मुलचेरा येथील शहीद बाबूराव शेडमाके विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर (क्र. ६३७)केंद्रप्रमुख म्हणून एस.वाय.पथारे तर पर्यवेक्षक एम.एम.खोब्रागडे कर्तव्यावर होते. पेपर सुरु असताना शिक्षणाधिकारी (मा.)वासुदेव भुसे यांच्या पथकाने भेट दिली असता १८ पैकी १४ विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेवर शिसपेन्सिलने उत्तरे लिहिलेली आढळली, तर काहींनी ही उत्तरे खोडलेली दिसून आले. सामूहिक कॉपीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वासुदेव भुसे यांनी सविस्तर अहवाल शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय सचिवांना पाठवला. त्यानंतर विभागीय सचिवांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी भुसे यांनी शिक्षण संस्थेला पत्र लिहून संबंधित केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले. त्या दोघांच्या ठिकाणी नवीन केंद्रप्रमुख व पर्यवेक्षक नेमण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. २५५ पानांचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांना धाडला. यात विद्यार्थ्यांकडील १४ प्रश्नपत्रिका, १८ विद्यार्थ्यांचे जबाब, लिपिक, पर्यवेक्षक व केंद्रप्रमुख यांच्या जबाबाचा समावेश आहे.

दरम्यान, केंद्रावर सीसीटीव्ही होते. सकाळी पावणेअकरा ते दुपारी २.२० वाजेपर्यंतचे चित्रीकरण शिक्षणाधिकाऱ्यांनी मागवले आहेत. या वेळेत केंद्रात कोण आले व विद्यार्थ्यांना कोणी उत्तरे सांगितली हे उघडकीस येईल. त्यानंतर फौजदारी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होणार काय?

दोन दिवंसापूर्वी सामूहिक कॉपीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले होेते. सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करुन दोषी शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले होेते. मुख्यमंत्री फडणवीस हे पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीतील सामूहकि कॉपी प्रकरणात या आदेशाची अंमलबजावणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.