कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या मराठी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासंदर्भातील ठराव एकमताने विधानसभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव संमत करण्यात आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार मांडण्यासाठी उभे राहिले असता गोंधळ निर्माण झाला. शिंदेंनी काँग्रेसचा उल्लेख करताच विरोधकांनी आरडाओरड सुरु केली.
सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठराव वाचून दाखवल्यानंतर एकमताने तो आवाजी मतदानाने संमत करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहाचे आभार मांडण्यासाठी उभे राहिले. हा विषय ६०-६५ वर्षांपूर्वीचा आहे. यासंदर्भात यापूर्वी अनेक ठराव आपण केले. आपल्या यशवंतराव चव्हाणच्या काळात देखील ठराव केला. तेव्हा राजकीय इच्छाशक्ती केंद्रात, महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्येही काँग्रेसचं सरकार होतं. अशोकरावजी जी वस्तूस्थिती आहे ती मी सांगतोय. त्या दिवशी पृथ्वीराजबाबा म्हणाले की गृहमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना एकत्र ठेवलं पाहिजे,” असं शिंदे म्हणाले. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी, “मी हे सभागृहात बोललो का?” असा प्रश्न विचारला. “अरे तुम्ही बाहेर बोलले ना,” असं उत्तर दिलं. मात्र मुख्यमंत्री शिंदेंच्या या विधानानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरडाओरड सुरु केला.
शिंदे आभार मांडत असताना त्यांनी काँग्रेसचा उल्लेख करुन राजकीय टीका करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातला. ठराव मांडण्याआधीच या ठरावर चर्चा व्हावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली असता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठरावावर चर्चा न करता तो एकमताने संमत करावा. चर्चा झाल्यास राजकीय आरोप प्रत्यारोप होतील असं फडणवीस म्हणाले होते. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी ठराव वाचून दाखवला. त्यानंतर तो सभागृह अध्यक्षांनी वाचला आणि संमत झाला.
नक्की वाचा >> महाराष्ट्राच्या विधानसभेत कर्नाटकविरोधात संमत झालेला ठराव जसाच्या तसा
ठराव संमत झाल्यानंतर शिंदेंनी आभार मांडतानाच काँग्रेसचा उल्लेख केल्याने गदारोळ सुरु केला. यावेळेस अध्यक्ष नार्वेकर विरोधकांना मुख्यमंत्री आभार व्यक्त करत असल्याचं सांगितलं. तरीही काही वेळापूर्वी फडणवीसांनी राजकीय आरोप प्रत्यारोप नको असं म्हटलं असतानाही शिंदेंनी काँग्रेसचा उल्लेख केल्याने विरोधकांनी गदारोळ सुरुच ठेवला. अजित पवार यांना विरोधीपक्ष नेते तुम्ही जागेवर बसा असं सांगत अध्यक्ष नार्वेकर विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर शिंदेंनी, “मी टीका नाही करत आहे,” असं सांगितलं. “दादा, मी टीका करत नाहीय. यामध्ये मी एवढेच सांगेल. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा एकजुटीने आपण सीमावासीयांच्या पाठिशी उभं रहावं,” असं शिंदे म्हणाले. तरीही शिंदेंनी काँग्रेसचा उल्लेख केल्याने विरोधकांचा गदारोळ सुरुच होता.
नक्की वाचा >> महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: सीमाप्रश्नाबाबत विरोधकांकडून ठराव?; विधिमंडळात सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची खेळी
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन विरोधकांना शांत करावं लागलं. फडणवीसांच्या या मध्यस्थीनंतर पुढे मुख्यमंत्री शिंदेंनी भाषण सुरु केलं. विरोधक शिंदेंच्या भाषणाच्या वेळी गदारोळ करत असतानाच उपमुख्यमंत्री फडणवीस जागेवरुन उठले आणि त्यांनी, “मुख्यमंत्री धन्यवाद देत आहेत आपण सीमाभागातील जनतेसाठी काय काय केलं आहे आणि काय करणार आहोत हे सांगत आहेत. आपल्या योजना सीमावर्तीय लोकांपर्यंत पोहचल्या तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे?” असा सवाल चढ्या आवाजामध्ये गदारोळ करणाऱ्या विरोधकांना केला.
यानंतर काही वेळ गदारोळ सुरु राहिला आणि अखेर विरोधकांना बोलण्याची संधी मिळेल असं अध्यक्षांनी सांगितल्यानंतर विरोधक शांत झाले. पुढे मुख्यमंत्र्यांनी सीमाभागातील लोकांसाठीच्या योजनांबद्दलची माहिती सभागृहाला दिली.