हिवाळी अधिवेशनानिमित्त शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे सध्या नागपूरमध्ये आहेत. आज त्यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारवर चौफेर टीका केली. हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली. तसेच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाच्या प्रकरणावरुनही भाजपावर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या वक्तव्याचा दाखला देऊन चक्क कर्नाटकातील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचेच आभार मानले. तसेच मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यामागे भाजपाचा काय मनसुबा आहे, याचे दाखले दिले.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, “२००८ साली सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, सीमाभागातील परिस्थिती जैसे थे ठेवा. पण २००८ पासून २०२२ पर्यंत कर्नाटक सरकारने सीमाभागात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यांनी तिथे विधानभवन बांधले, उपराजधानी केली. बेळगावचे नामांतर केले. मराठी भाषिकांवर भाषिक अत्याचार केले, त्याला आपण काहीच उत्तर दिलेले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली पाहीजे. २००८ पासून २०२२ पर्यंत काय काय बदल झाले, हे मांडले पाहीजे. जेणेकरुन सीमाभाग महाराष्ट्राचा होईल.”
हे ही वाचा >> “मोहन भागवतांनी RSS कार्यालयात कुठे लिंबं वगैरे…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले, “संघानं काळजी घ्यावी!”
भाजपाच्या पोटातलं त्या मंत्र्यांच्या ओठावर आलं
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या वक्तव्याचा हवाला देऊन उद्धव ठाकरेंनी टोलेबाजी केली. ते म्हणाले, “दीड महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जशी निवडणूक जवळ येईल तसे शिवसेनेकडून पुन्हा मुंबई तोडण्याचा डाव असा अपप्रचार सुरु होईल. आता भाजपाच्या पोटातलं भाजपच्याच (कर्नाटकाच्या) मंत्र्यांच्या ओठावर आलं. मुंबई तोडण्याचा आणि मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव भारतीय जनता पक्षातल्या पोटात आहे. तो त्यांच्याच मंत्र्याने जगासमोर आणला.”
हे ही वाचा >> “मुंबई, महाराष्ट्रातही कर्नाटकचे लोक राहतात…” असं म्हणत एकनाथ शिंदेंचा कर्नाटकला इशारा
मी कर्नाटकच्या मंत्र्यांना धन्यवाद देतो
आज मुख्यमंत्री बोम्मई ज्या हिमतीने आणि धाडसाने बोलत आहेत, त्या तुलनेत आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत नाहीत किंवा काही काम करत नाहीत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. “सीमाभाग देणे सोडाच पण सोलापूर, अक्कलकोट यावरही कर्नाटकने हक्क सांगितल्यानंतर आता मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचे वक्तव्य मंत्री करत आहेत. त्यावरुन हा भाजपाच्याच पोटातील डाव आहे, हे या निमित्ताने मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले आहे. मुंबई भाजपच्या ताब्यात गेली तर हे लोक मुंबई आणि महाराष्ट्राचा कसा घात करतील, हे कर्नाटकातील भाजपाच्या मंत्र्यांच्या विधानावरुन जगासमोर आणले. म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो.”