वर्धा: मराठी मातीला कुस्तीचे असलेले वेड लपून नाही. राज्यातील अनेकांनी राष्ट्रीय पातळीवर आपले डाव टाकून चीत केल्याचा इतिहास आहे. आता विदर्भात ही परंपरा कायम ठेवण्यात तीन वेळा विदर्भ केसरी राहलेले माजी खासदार रामदास तडस यांना श्रेय दिल्या जाते. ते सध्या राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. आता त्यांनी महिलाच्या कुस्ती स्पर्धा आयोजनात पुढाकार घेतला आहे. त्यांचा गड म्हटल्या जाणाऱ्या देवळीत या स्पर्धा २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान होतील. भारतीय कुस्तीगीर महासंघाची यांस मान्यता असून राज्य संघातर्फे तसेच वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे आयोजन होणार. राज्यस्तरीय वरिष्ठ गट ( गादी व माती ) अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब लढत तसेच वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी किताब लढत अशी ही स्पर्धा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरुष गटातील स्पर्धा वाडिया पार्क अहिल्यानगर येथे तर महिला स्पर्धा २४ व २५ जानेवारीस देवळीतील विदर्भ केसरी रामदास तडस स्टेडीयमवर रंगणार. जिल्हा पुरुष व महिला संघाची निवड १५ जानेवारीस देवळीत होणार असल्याची माहिती जिल्हा संघाचे सचिव मदनसिंग चावरे देतात. महिला कुस्ती स्पर्धा ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५ व ७२ या वजनगटात तर महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत ६५ ते ७६ किलो वजनगटात होईल. कुस्तीगीरांची जन्मतारीख २००४ किंवा त्या पूर्वीची असावी. पालकांचे संमतीपत्र अनिवार्य आहे. जिल्हा संघास गादी व माती अशी वेगवेगळी प्रवेशिका पाठवायची आहे. वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी गटात ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२ व ९७ तसेच महाराष्ट्र केसरी ८६ ते १२५ या वजनगटात होणार. माती गटात ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ तर महाराष्ट्र केसरी ८६ ते १२५ या वजनगटात स्पर्धा रंगतील.

हेही वाचा : राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात मुंबई पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या स्थानावर

या स्पर्धा अधिक चूरशीच्या व रंगतदार होण्यासाठी आयोजन समिती नियोजन करीत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे स्पर्धेच्या आयोजनात मार्गदर्शन करीत आहे. स्पर्धेच्या विविध गटात आकर्षक असे रोख व भेटवस्तू स्वरूपात पुरस्कार ठेवण्यात येणार आहेत. देवळीत या महिला गटातील महाराष्ट्र केसरी व अन्य स्पर्धा होत असल्याने सर्व ती तयारी करण्यास सुरवात झाली आहे. अधिकाधिक कुस्तीप्रेमी येण्याची अपेक्षा असल्याने निवास व अन्य सोयी पसंत पडतील अश्याच राहतील, अशी खात्री रामदास तडस देतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra kesari woman wrestling wardha deoli village from 29th january to 2nd february ramdas tadas pmd 64 css