वर्धा : महाराष्ट्र कुस्तीगीर संघ क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्रातील बलाढ्य संघटना समजली जाते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अनेक दशकापासून या संघावर राहलेले वर्चस्व माजी खासदार रामदास तडस यांनी मोडून काढले. या कार्यात त्यांना मोठी मदत झाली ती पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची. तडस अध्यक्ष तर ते उपाध्यक्ष आहेत. आता तडस पराभूत झालेत तर मोहोळ यांची थेट केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

राजकीय आखाड्यात चीत झाल्याने नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्यापूर्वी कुस्तीगीर संघावर तडस यांच्या पराभवाने निराशेचे मळभ दाटले होते. मात्र संघाचे उपाध्यक्ष मोहोळ यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागताच संघ आनंदून गेला आहे.

हेही वाचा…गडचिरोलीत आदिवासी, ओबीसी मतदार भाजपपासून दुरावले!

दिल्लीतून बोलतांना रामदास तडस म्हणाले की मोहोळ हे आमच्या पैलवान मित्र कुटुंबातील एक आहेत. त्यांनी संघासाठी मोठे योगदान दिले आहे. पुण्यात भव्य कुस्ती स्पर्धा भरविण्यात त्याचे मिळालेले योगदान आम्ही विसरू शकत नाही. त्यांच्या मंत्रीपदी येण्याने महाराष्ट्र कुस्तीगीर संघास सुगीचे दिवस येतील. संघांचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा मी मोहोळ यांच्याकडून ठेवत आहे. आज कुस्तीगीर संघांचे पदाधिकारी दिल्लीत पोहचत आहे.

आम्ही मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार करणार आहोत, असे तडस यांनी सांगितले. गत बारा वर्षांपासून मोहोळ व तडस यांची मैत्री असून आता कौटुंबिक संबंध निर्माण झाल्याचे सांगितल्या जाते. मुळशी तालुक्यातील मोहोळ कुटुंब १९८५ मध्ये पुण्यात स्थायिक झाले. कुटुंबास कुस्तीची पार्श्वभूमी आहे. मुरलीधर मोहोळ यांचे आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ यांनी पण शिक्षण घेत असतांनाच कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली होती. पुढे कुस्तीसाठी ते कोल्हापूरला गेले. आंतर महाविद्यालयीन तसेच राष्ट्रीय स्तरावर त्यांनी कुस्ती स्पर्धा गाजविल्याचा इतिहास आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : महापालिका राजकारणात सक्रिय नेत्यांच्या पराभवाचा इतिहास

तर तडस यांनाही ग्रामीण पार्श्वभूमी असून शिक्षण घेत असतांनाच त्यांनी कुस्तीत कसलेला मल्ल म्हणून नाव कमविले. ते तीन वेळा विदर्भ केसरी राहले. पुढे राजकीय आखाड्यात उतरले. देवळीचे दोन वेळा नगराध्यक्ष, दोन वेळा विधानपरिषदेचे आमदार तर दोन वेळा ते खासदार राहले. भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर कुस्ती प्रेमातून ते व मोहोळ मित्र झाले. दोघेही भाजपचे म्हणून ही मैत्री अधिक घट्ट झाली. महाराष्ट्र कुस्तगीर संघाची निवडणूक त्यांनी एकत्रित लढविली.

हेही वाचा…WORLD EYE DONATION DAY : महाराष्‍ट्रात अंधत्‍व निवारण कार्यक्रमाची मंदगती ; वर्षभरात केवळ…..

ज्येष्ठ व संघटनेत अधिक स्वारस्य म्हणून तडस संघांचे अध्यक्ष झाले तर उपाध्यक्षपद मुरलीधर मोहोळ यांना मिळाले. दोन वर्षांपूर्वी संघात वाद निर्माण झाले तेव्हा तडस मोहोळ जोडीने ते यशस्वीपणे शांत केले. आता तडस यांचा पराभव झाला तर मोहोळ मंत्री झालेत. त्यामुळे संघात ‘खट्टा मिठा’ वातावरण असल्याचे म्हटल्या जाते.