अमरावती : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याची चर्चा सुरू असतानाच अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी मात्र, मी काँग्रेससोबत आहे, काँग्रेससोबतच राहणार असून काँग्रेसलाच मतदान केल्याचे सांगत त्यांच्याबाबत सुरू असलेली चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसच्या स्थानिक राजकारणापासून दूर लोटण्याचे प्रयत्न सुरू असून आपले मत फुटल्याची चर्चा हा त्याच षडयंत्राचा एक भाग असल्याचा आरोप सुलभा खोडके यांनी केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ४२ आमदार असले, तरी पक्षाच्या उमेदवारांना त्याहून अधिक मते मिळाली. यामुळेच भाजप आणि अजित पवार गटाला महाविकास आघाडी किंवा अन्य पक्षांची मते मिळाल्याचे उघड झाले. सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत. त्यातच काँग्रेसची मते फुटल्याची कबुली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ही मते कोणती, याची चर्चा सुरू झाली असताना अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पण, माझे मत फुटलेले नाही, मी आजही काँग्रेस पक्षासोबतच आहे, असे सुलभा खोडके यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : विधान परिषद निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचा जो आमदार फुटला…त्याचे नाव…
सुमारे दोन वर्षांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दोन दिवसीय अमरावती दौऱ्यादरम्यान आमदार सुलभा खोडके यांना निमंत्रणच नसल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील बैठकांना सुलभा खोडके यांना निमंत्रित केले जात नव्हते, स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांकडून अवहेलना होत असल्याचा आरोप सुलभा खोडके यांनी त्यावेळी केला होता. यासंदर्भात आपण वरिष्ठांनाही वेळोवेळी अवगत केले असल्याचे सुलभा खोडके यांनी म्हटले होते.
हेही वाचा : वाशिम : ४५ हजारावर लाडक्या बहिणी लाभासाठी रांगेत, अर्ज दाखल करण्याची लगबग…
मी आजपर्यंत कधीही काँग्रेस पक्षाची विचारधारा सोडून कोणत्याही पक्षात गेलेली नाही. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या उमेदवारीवर व पंजाच्या चिन्हावर २०१४ मध्ये बडनेरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला. २०१९ ला पुन्हा काँग्रेस पक्षाकडूनच अमरावती मतदार संघातून निवडणूक लढवीत विजयी झाले, भाजपच्या उमेदवाराचा तब्बल २० हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे मी काँग्रेस पक्षामध्येच आहे, असे सुलभा खोडके यांनी सांगितले. त्यांनी कुणाचेही नाव न घेता स्थानिक पातळीवरील विरोधाच्या राजकारणातून आपल्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात असल्याचे सांगितले.