लोकसत्ता टीम
भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भात दहा पैकी आठ जागांवर महाविकास आघाडी पुढे असल्याने भाजपला विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
विदर्भात एकूण लोकसभेच्या १० जागा असून त्यापैकी नागपूर, बुलढाणा, भंडारा वगळता इतर सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार पहिल्या फेरीत आघाडीवर आहे. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे पहिल्या फेरी अखेर ११ हजार मतांनी पुढे आहेत. बुलढाण्यात शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव व भंडारा-गोदियामधून भाजपचे सुनील मेंढे आघाडीवर आहेत. अकोल्यात काँग्रेसचे अजय पाटील आघाडीवर आहे. हा भाजपला मोठा धक्का मानला जातो. हा भाजपचा गड मानला जात होता. प्रकाश आंबेडकर येथून निवडणूक लढत आहे.
आणखी वाचा-Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : नागपूरमध्ये नितीन गडकरींची आघाडी साडेचार हजारांवर
सर्वाचे लक्ष लागलेल्या अमरावती मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा पहिल्या फेरीत मागे पडल्या आहेत. येथून काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब वानखेडे आघाडीवर आहेत ही जागा भाजपने प्रतिष्ठेची केली होती. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पुढे आहे. येथे दहा वर्षापासून भाजपचा खासदार होता. वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे आघाडीवर आहेत. यवतमाळ -वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार व विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार हे मागे पडले असून तेथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या आठ हजारावर मतांनी आघाडीवर आहेत.