लोकसत्ता टीम
यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी मतांची आघाडी घेतली. पाचव्या फेरी अखेर देशमुख यांनी २८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पुढे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीने महायुतीला मागे टाकल्याचे चित्र आहे. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातही शिवसेना उबाठाचे उमेदवार संजय देशमुख यांनी मुसंडी घेतली आहे. मतदानोत्तर कल चाचणीमध्ये यवतमाळ – वाशिममधून संजय देशमुख हे विजयी होतील, असे सांगितले जात होते. आजचा निकाल त्या दृष्टीने पुढे सरकत आसल्याचे चित्र आहे. या मतदारसंघात एकूण १७ उमेदवार रिंगणात होते. मात्र लढत शिवसेना विरूद्ध शिवसेना अशीच थेट झाली.
आणखी वाचा-वंचित आघाडीला झटका, पहिल्या फेरीत किशोर गजभिये यांना केवळ ९४२ मते
पाचव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना एक लाख १३ हजार ६९ तर महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री हेमंत पाटील ८४ हजार २८७ इतके मतं आहेत. या फेरीअखेर संजय देशमुख २८ हजार ७८२ मतांनी आघाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दिलेले समनक पार्टीचे उमेदवार अनिल राठोड हे तिसऱ्या स्थानावर आहेत. बसपाकडून रिंगणात असलेल माजी खासदार हरिभाऊ राठोड हे चौथ्या स्थानावर आहेत.
मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी
येथील दारव्हा मार्गावरील मतमोजणी केंद्राबाहेर महाविकास व महायुतीच्या समर्थकांनी गर्दी केली आहे. पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे संजय देशमुख पुढे असल्याने आता महाविकास आघाडीतील समर्थकांची गर्दी वाढत आहे. शहरात ठिकठिकाणी टपरी व सार्वजनिक ठिकाणी नागरिक टिव्हीवर निकाल बघत असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी मतमोजणी केंद्रासह ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.