लोकसत्ता टीम
वर्धा : महाआघाडीचे अमर काळे यांची विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू झाल्याचे चित्र असतांनाच महायुतीचे रामदास तडस समर्थक मात्र मोर्शी या एका विधानसभा क्षेत्रावर आस ठेवून असल्याचे दिसून येते. मत मोजणीच्या तेराव्या फेरीत अमर काळे यांना २ लाख ९१ हजार ९७५ तर रामदास तडस यांना २ लाख ५० हजार ७७५ मते प्राप्त झाली आहे. अजून जवळपास तेवढ्याच फेऱ्या बाकी आहे.
निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धिस दिलेल्या आठव्या फेरीचा उपलब्ध तक्ता तडस यांना दिलास्याचा म्हणटल्या जातो. या फेरीत मोर्शीत तडस यांना ५ हजार १५४ तर काळे यांना ३ हजार ६७४ मते प्राप्त झाली. पहिल्या फेरीत मोर्शीत काळे, दुसऱ्या फेरीत तडस, तिसऱ्या फेरीत काळेंना साडे तीन हजार तर तडस यांना सहा हजारावर मते पडली. चौथ्या फेरीत काळे – २९४२ तर तडस – ५५९१, पाचव्या फेरीत काळे – ३२७७ तर तडस – ४०१९, सहाव्या फेरीत काळे – २३६७ तर तडस – ४६५७, सातव्या फेरीत काळे – ३३३८ तर तडस – ४२१५ असे पहिली फेरी वगळता तडस यांना मोर्शी मतदारसंघाने साथ दिली आहे. तर त्यांचा गढ समजल्या जाणाऱ्या देवळीत काळेंनी मुसंडी घेतली. आठव्या फेरीत काळेंना या ठिकाणी ३ हजार ३६७ तर तडस यांना केवळ १ हजार ७१७ मते प्राप्त झाली. आर्वीचे आमदार राहलेले अमर काळे यांना आर्वी विधानसभा क्षेत्रातून अपेक्षीत मते मिळत नसल्याची आकडेवारी आहे. धामनगाव, हिंगणघाट व वर्धा मतदारसंघात अमर काळे सातत्याने वरचढ ठरत असल्याचे दिसून येते.
आणखी वाचा-रामटेकमध्ये दहा पैकी नऊ फेरीत शिवसेना (शिंदे) गटाची पिछाडी
मतमोजणीच्या २४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. वर्धा मतदारसंघात ६४.७९ टक्के मतदान झाले आहे. एकूण १० लाख ९१ हजार ३४९ मतदारांनी हक्क बजावला होता. सर्वाधिक मतदान आर्वीत ६८.९१ टक्के तर सर्वात कमी धामनगाव येथे ६१.७१ एवढे झाले होते.